"आई तुझ्या हाताची ऊब मला आता सुद्धा जाणवते"
2022 हे वर्ष नुकतेच सुरू झाले होते. कोरोना महामारीच्या दीर्घ अंधारातून देश हळूहळू बाहेर पडत होता, परभणी जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होत होते, बस, रेल्वे, बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या होत्या आणि थांबलेलं आयुष्य पुन्हा धावू लागल्यासारखं वाटत होतं, मात्र याच काळात माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आघात माझी वाट पाहत आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती. आईच्या मनात मुंबई गोरेगाव येथे राहणाऱ्या तिच्या भावंडांना, आईला, बहिणींना भेटण्याची आणि औरंगाबाद येथे दिलेल्या मुलीच्या लेकरांना पाहण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती, ती अनेक दिवस माझ्या मागे लागली होती, मी मात्र परिस्थिती चांगली नाही, अजून धोका आहे असं समजावत होतो, पण शेवटी आईच्या हट्टापुढे माझी काळजी हरली आणि ती मुंबईला गेली. तिकडे असतानाही तिचा दररोज फोन यायचा, कधी मामीच्या, कधी मामाच्या, कधी काकाच्या, कधी मावशीच्या तर कधी त्यांच्या मुलांच्या फोनवरून, आणि प्रत्येक वेळी तिचे तेच प्रश्न असायचे – कुठे आहेस, जेवलास का, घरचे कसे आहेत, काळजी घे – आई कुठेही असली तरी तिचं मन कायम घरातच असतं हे त्या प्रत्येक कॉलमधून जाणवत होतं, आणि माझं एकच उत्तर असायचं – आई, लवकर घरी ये. 26 जानेवारी जवळ येत होता आणि रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाची अध्यक्ष असल्यामुळे दरवर्षी झेंडावंदन आईच्याच हस्ते होत असे, म्हणून माझ्या आग्रहावरून झेंड्याच्या दोन दिवस आधी ती परभणीला परत आली, तिला पाहताच तिच्या चेहऱ्यावरचा थकवा मला जाणवला, तरी विचारल्यावर तिने नेहमीप्रमाणे हो म्हणून उत्तर दिलं. प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला, आईच्या हस्ते झेंडावंदन झालं, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप झालं, ती हसत होती, बोलत होती, कुणालाही वाटणार नव्हतं की तिच्या शरीरात काहीतरी गंभीर घडत आहे, मात्र रात्री ती अस्वस्थ असायची, खोकला, अंगदुखी वाढत होती, तरीही डॉक्टरकडे जाण्याला ती नकार द्यायची आणि फक्त मेडिकलमधून औषध आणायला सांगायची. सात-आठ दिवस निघून गेले, पण तब्येत सुधारली नाही आणि 4 फेब्रुवारी 2022 रोजी मी कॉलेजमध्ये असताना रमा ताईने आईला परभणीतील सूर्या आयसीयू रुग्णालयात दाखल केलं, तिचा रडका फोन आला आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला.
डॉक्टरांनी तपासण्या केल्या, कोरोना चाचणी निगेटिव्ह आली, पण फुफ्फुसांमध्ये मोठ्या प्रमाणात कफ साचल्याचं निदान झालं, आई मात्र अजूनही हसत होती, बोलत होती, जेवत होती, जणू आम्ही काळजी करू नये म्हणून ती स्वतःचं दुखणं लपवत होती, परंतु रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की तिची तब्येत अत्यंत सिरीयस असून तात्काळ नांदेड किंवा मुंबईला हलवणं गरजेचं आहे, हे ऐकताच माझे हातपाय थंड पडले. मी ही माहिती मुंबईला असलेल्या माझ्या मधल्या भावाला सुभाषला दिली, घरच्यांशी चर्चा करून 5 फेब्रुवारी 2022 रोजी ॲम्बुलन्स करून आईला नांदेडला पाठवण्यात आलं, तिच्यासोबत मोठी बहीण रमा ताई, दाजी लक्ष्मण, मोठा भाऊ प्रकाश आणि भाचा राहुल गेले. आईच्या उपचारासाठी जवळ पैसे नव्हते, म्हणून आईचं सोनं, पत्नी प्रियंकाचं सोनं, रमा ताईचं सोनं, माझी अंगठी, चैन आणि मंगळसूत्र गहाण ठेवून सुमारे नव्वद हजार रुपये जमवले, कारण त्या क्षणी पैशांपेक्षा आईचा श्वास अधिक मौल्यवान होता. रात्री साडेआठच्या सुमारास राहुलचा फोन आला की आम्ही नांदेडला पोहोचलो आहोत, खाजगी रुग्णालयात दाखवल्यानंतर डॉक्टरांनी उशीर झाल्याचं सांगत शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला, हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली, मी आईला फोन केला तेव्हा ती शांतपणे म्हणाली – मला काही नाही झालं, मला घरी जायचं आहे – तिच्या आवाजात भीती नव्हती, पण वेळ मात्र आमच्या हातातून निसटत चालली होती. शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणी झाली, तीही निगेटिव्ह आली आणि शेवटी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं, मी सतत फोनवरून माहिती घेत होतो, आईला थोडं खाऊ घालण्यात आलं आणि मी तिच्याशी फोनवर बोललो, तेच तिच्याशी झालेलं शेवटचं संभाषण ठरलं, ती म्हणाली – तू कधी येशील – मी म्हणालो – सकाळी लवकर येतो – आणि ती म्हणाली – लवकर ये. रात्री बारा एकच्या सुमारास फोन आला की आईला श्वास घ्यायला त्रास होत असून नाकात नळी टाकावी लागेल, सुरुवातीला विरोध झाला, मन मान्य करायला तयार नव्हतं, पण परिस्थितीपुढे झुकावं लागलं, डॉक्टरांनी नळी टाकली आणि हळूहळू आईचे हातपाय हलणं बंद झालं, डोळे मिटले, बोलणं थांबलं, डॉक्टर सांगत होते – तिला झोपू देऊ नका, बोलत ठेवा – सगळे बोलत होते, पण प्रतिसाद नव्हता, फक्त मशीनवर चालणारा कृत्रिम श्वास उरला. 6 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री साधारण अडीच वाजता राहुलचा फोन आला, त्याचा आवाज तुटलेला होता – मामा… मोठी आई गेली – त्या क्षणी माझं जग संपलं, शब्द हरवले, श्वास अडखळला आणि आयुष्य पोकळ झालं. पहाटे तीन-साडेतीनच्या सुमारास आईचं निर्जीव शरीर ॲम्बुलन्सने घरी आलं, कालपर्यंत हसत बोलत नांदेडला गेलेली आई आज शांत, निश्चल अवस्थेत परत आली होती, तिचा थंड पडलेला हात हातात घेतला आणि आयुष्यभराची उब हरपल्याची जाणीव झाली, ज्या हाताने चालायला शिकवलं, भुकेल्या पोटात घास घातला, चुकलं तर शिक्षा केली, यश मिळालं तर मायेने डोक्यावरून हात फिरवला, तेच हात आता कधीच परत येणार नव्हते. वडिलांनंतर आईने कधीही पोकळी जाणवू दिली नाही, तिने मला शिक्षण दिलं, पत्रकार बनवलं, समाजसेवक बनवलं, माणूस म्हणून घडवलं, अशिक्षित असूनही सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आरोग्य आणि सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि आज समाजात जो मान आणि प्रतिष्ठा आहे त्याचं सर्व श्रेय माझ्या आईलाच जातं, पण आज तीच आई माझ्या आयुष्यात नाही. म्हणूनच 6 फेब्रुवारी हा दिवस माझ्या जीवनातील काळा दिवस आहे. आई–पप्पा, तुमच्याच संस्कारांच्या आणि आशीर्वादाच्या बळावर आज मी उभा आहे, तुमचीच प्रेरणा घेऊन समाजात काम करत आहे आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्यासोबत आहे असंच मी मानतो.
मिस यू आई…😢
मिस यू पप्पा…😢
तुमचा लेक
प्रमोद....

