परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने (स्था.गु.शा.) धडक कारवाई करत परभणी शहरातून तलवारी बाळगणाऱ्या एका युवकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बुधवार, दि. 14 मे 2026 रोजी साखला प्लॉट परिसरात करण्यात आली. पोलीसांकडून शहरात गस्त सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, साखला प्लॉट येथील कृष्णा सिंग साहेबसिंग टाक याच्या घरात तलवारी ठेवण्यात आल्या आहेत. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे कृष्णा सिंग साहेबसिंग टाक (वय 20, रा. साखला प्लॉट, परभणी) हा युवक आढळून आला. त्याची चौकशी करून घराची झडती घेतली असता दोन तलवारी जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या तलवारींची अंदाजे किंमत 2 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन कोतवाली येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 230/2026 अन्वये कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा तसेच कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जीवन बेनीवाल यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात सपोनि जायभाय, पोलीस अंमलदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, जमीर फारूकी, उमर सय्यद, सूर्यकांत फड, रफीयोद्दीन शेख, हाणवते आदींचा समावेश होता.

