परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) तालुक्यातील मौजे पोखर्णी नृ. येथे बौद्ध समाज मंदिर व केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात खुलेआम अवैध देशी दारू विक्री सुरू असल्याचा आरोप करत वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने पोलिस अधीक्षक परभणी पंकज कुमावत व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना दिनांक 18 मे 2026 रोजी तक्रार निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, बौद्ध समाज मंदिर तसेच शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू असून परिसरात विद्यार्थी, विशेषतः मुलींची मोठी वर्दळ असते. त्यामुळे दारू पिणाऱ्यांकडून छेडछाड व विनयभंगाच्या घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत दैठणा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना वारंवार माहिती देऊनही संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा दि. ६ जून २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी, जिल्हा शाखा परभणीच्या वतीने प्राणांतिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष गणेश वाल्मीक गाढे, तालुकाध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे, महानगराध्यक्ष मुदस्सीर असरार, महानगर संघटक रंजीत मकरंद, युवा जिल्हा सचिव मोहन गाढे, युवा जिल्हा कोषाध्यक्ष प्रताप पंडित, माजी जिल्हा महासचिव मुजफ्फर खान, समता सैनिक दलाचे विजयकुमार सावंत, सुशीलाबाई निसर्गन तसेच ग्रामस्थ रामेश्वर भदर्गे, रोहिणी भदर्गे, पृथ्वीराज असले आदी उपस्थित होते.



