सेलू (समाजहित न्यूज वृत्तांत) दि. 08 नोव्हेंबर 2025 सेलू नगर परिषद निवडणुकीची चाहूल लागताच राजकीय वातावरण रंगू लागले असून वंचित बहुजन आघाडी पक्षाने उमेदवार निवडीची प्रक्रिया झपाट्याने सुरू केली आहे. आज अक्षदा मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत इच्छुक उमेदवारांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. परभणी जिल्हाध्यक्ष (उत्तर) प्रमोदभाऊ कुटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मुलाखत सत्राने पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचे दर्शन घडवले.
मुलाखत प्रक्रियेला सुरुवात होताच पक्षाच्या सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला. पक्षाने यावेळी पारदर्शकता आणि संघटनात्मक बांधिलकी यांना प्राधान्य देत उमेदवारांची गुणवत्ता, स्थानिक जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांतील स्वीकारार्हता या निकषांवर मुलाखती घेतल्या. कार्यक्रमाला पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि पदाधिकारी म्हणून परभणी शिवाजी वाकळे व मुजफ्फर खान (जिल्हा महासचिव उत्तर), भगवान देवरे (जिल्हा सचिव उत्तर), एन. जी. खंदारे (कोषाध्यक्ष उत्तर), धम्मपाल सोनटक्के (जिल्हा संघटक उत्तर), तुकाराम भारती (जिल्हा सल्लागार उत्तर), बी. आर. आव्हाड (जिल्हा सदस्य उत्तर), सुनिता साळवे (महिला जिल्हाध्यक्षा), गणेश गाढे (युवक जिल्हाध्यक्ष उत्तर), छाया खरात (जिल्हा उपाध्यक्षा) आणि छाया पाईकराव (तालुका अध्यक्षा) यांची विशेष उपस्थिती लाभली.![]() |
या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांसोबत संवाद साधून त्यांच्या कार्यशैली, सामाजिक उपस्थिती, मतदारांतील ओळख आणि आगामी निवडणुकीसाठी ते मांडत असलेले मुद्दे यांचा आढावा घेतला. मुलाखतीदरम्यान उमेदवारांनी आपापल्या विभागातील समस्या, नागरिकांच्या अपेक्षा आणि पक्षाच्या ध्येयधोरणांची अंमलबजावणी करण्याची तयारी याबाबत मांडणी केली. सेलू व परभणी उत्तर विभागातील अनेक अनुभवी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिल्याने संपूर्ण परिसरात निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला होता. पक्षातील कार्यकर्त्यांनी मुलाखतींच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजन विठ्ठल मगर यांनी प्रभावीपणे पार पाडले. शिस्तबद्ध आयोजन, उमेदवारांचा उत्साह आणि पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती पाहता वंचित बहुजन आघाडी पक्षाची निवडणुकीपूर्व तयारी मजबूत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.



