परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) : समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना गौरविण्यासाठी रविवारी दिनांक २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत परभणी येथील बी. रघुनाथ सभागृहात भव्य राज्यस्तरीय सामाजिक सन्मान गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन गुरु रविदास चॅरिटेबल ट्रस्ट आणि अदित्य सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत असून, पुरस्कार वितरणासाठी राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. समाजकार्य, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास यांसारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या सोहळ्यात विशेष सन्मानपत्र, प्रशस्तिपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा आहे. या निमित्ताने सामाजिक बांधिलकी वाढीस लागावी व कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी हा उद्देश आयोजक संस्थांचा आहे. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टचे संचालक अंकुश जोगदंड, सचिव गोपीचंद गुरव तसेच अदित्य सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव दुधंबे यांनी सर्व समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

