जिंतूर (समाजहित न्यूज वृत्तांत) परभणी जिल्ह्यातील ईटोली गावात दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री घडलेल्या एका घटनेमुळे एक मेंढपाळ कुटुंब भयभीत झाले असून, वन विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मेंढपाळ श्री. चिमा श्यामराव हाके यांनी विभागीय वन अधिकारी, हिंगोली यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात ही घटना दिली आहे. निवेदनात म्हटले आहे की, रात्री १२ वाजता श्री. हाके हे घरी नसताना, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. जाधवर, श्री. कैलास नागरगोजे व इतर वन कर्मचाऱ्यांनी गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना घेऊन त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. यावेळी घरात केवळ पत्नी व लहान मुले उपस्थित असताना त्यांना दमदाटी करण्यात आली. “तुमचा नवरा कुठे आहे?”, “तुमच्या मेंढ्या किती आहेत?” असे प्रश्न विचारून दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे श्री. हाके यांच्या पत्नीला तीव्र मानसिक धक्का बसून छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय उपचारांनंतर MLC दाखल करण्यात आले आहे. श्री. हाके यांनी विचारले आहे की, या बेकायदेशीर छाप्याची जबाबदारी कोण घेणार?
वन अधिकाऱ्यांची एकतर्फी कारवाई?
श्री. हाके यांनी सांगितले की, ईटोली शिवारात एकूण १४ मेंढपाळ खांड असताना केवळ त्यांच्या खांडावरच कारवाई करण्यात आली, ही सूडबुद्धी असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी केला आहे. “जर खांड गावाबाहेर हलवायच्या असतील तर सर्व मेंढपाळांवर तो निर्णय लागू करावा,” अशी त्यांची मागणी आहे.
पोलीस तक्रारीला प्रतिसाद नाही!
या संपूर्ण प्रकरणाबाबत श्री. हाके यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तक्रार नोंदवून घेतली गेली नाही, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे प्रशासन, वन विभाग व पोलिसांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तसेच निवेदनद्वारे करण्यात आलेल्या मागण्या वन अधिकार्यांची व कर्मचाऱ्यांची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी., गरीब मेंढपाळांवर अन्याय करणाऱ्या निवडक कारवाया थांबवाव्यात, मेंढपाळ व्यवसायासाठी जिल्ह्यात भुखंड उपलब्ध करून द्यावेत, गावातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या संलनात आलेल्या कारवायांची चौकशी व्हावी इत्यादी मागण्या आहेत. सदर प्रकरणाची प्रत माहितीस्तव व कार्यवाहीस्तव जिल्हाधिकारी परभणी, पोलीस अधीक्षक, वनसंरक्षक व तहसीलदार यांच्याकडे पाठविण्यात आली आहे.


