आपली या आलम दुनियेत 'किशन मारोती रोडे'' म्हणून जरी ओळख असली तरी होळकर परिवाराचे गणगोत म्हणूनच राणीसावरगाव परिसरात आपला परिचय तसा सर्वदूर आहे. स्मृतीशेष राहीबाई पिराजी इंगळे ही आपली आत्या. माझ्या भावाच्या पोटी कृष्ण जन्माला यावा म्हणून तिने उभी हयात भर श्रीकृष्णाचा शुक्रवार उपवास धरला आणि माता सुलोचना बाईच्या पोटी 20 ऑगस्ट 1967 रोजी कान्हा म्हणजेच किशन मारुती रोडे यांचा म्हणजेच आपला जन्म झाला. या जगात तशी अनेक माणसे जन्माला येतात. निघून जातात. पण तुमच्यासारखे असे यशस्वी व्यक्तिमत्वाचे लोक अपवादात्मक जन्मास येतात.माता सुलोचनाबाई आणि पिता स्मृतीशेष मारोती गुणाजी रोडे यांच्या पोटी एक बंधू आणि दोन बहिणी अगोदर आपला जन्म झाला आणि बोधडी खुर्द नगरीसह सर्व मुलुख धन्य झाला. आपण बोलताना सहज मी आपणास विचारले आपले आदर्श कोण आहेत.. आपल्या तोंडून वडिलांचे म्हणजे दादांचे नाव आले.प्रामाणिक, कष्टकरी शेतमजूर आपले दादा हे केवळ कुटुंबाचेच नव्हे, तर तुमच्या यशाचे खरे शिल्पकार आहेत.
ग्रामीण भागातील साधे पण कष्टाळू शेतकरी असलेले दादा, यांनी आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरे जाऊन तुम्हाला उभं केलं. दोन मुलं आणि दोन मुली यांना उच्च शिक्षित करण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले.आज तुम्ही ज्या उंचीवर आहात, त्याचं श्रेय तुमच्या दादांना आहे. दादांनी प्रत्येक वेळी तुम्हाला पुढे जाण्यासाठी पाठबळ दिलं, धीर दिला, आणि स्वप्न बघण्याचं धाडस दिलं."दादांच प्रेम म्हणजे आपलं खरं वैभव आहे!"
सर आपलं बालपण बोधडी खुर्द ,पारडी खुर्द टापूत गेलं.गोकुळातल्या किसनदेवाच्या लीळांसारख्या कैक कलागती आम्ही साक्षात आपल्याच श्रीमुखाद्वारे ऐकल्या. आपल्या मनातल्या, फारशा कोणाला न सांगितलेल्या गोष्टी बालमित्रांकडे सुरक्षित आहेत, याची आपल्यालाही मनापासून खात्री असते. बालपणीचे सवंगडी प्रकाश नानोर ,ज्ञानेश्वर नागरगोजे, उत्तम पाईकराव ,मारुती बेडे ,मधुकर राडकर व पांडुरंग डहाळे यांनी बालजीवनाला परिपक्वता आणली.प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोधडी खुर्द श्री मस्के सरांच्या सानिध्यात झालं.आपलं बालपण किती संपन्न आणि गरिबीचं होतं,ते त्यातून समजलं. माध्यमिक शिक्षणासाठी गाव कुसाबाहेर जिल्हा परिषद प्रशाला पार्डी खुर्द बोधडी आरमाळकर आणि रायठक सरांच्या मार्गदर्शनात झालं. आपण विज्ञानाचे गुणी विद्यार्थी होतात म्हणून आपण ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथे विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन वैद्यनाथ कॉलेज परळी येथे आपण पदवी शिक्षण पूर्ण केले आणि त्यावर आपल्याला प्राचार्य गीते सरांचा प्रभाव पडला. पदव्युत्तर शिक्षणासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आपण प्रवेश घेतला आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून आपण व्यावसायिक अध्यापक पदवी मिळवली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून पाली विषयात पेट उत्तीर्ण झालात. आपले आवडते गीत ये प्रेम पत्र पढकर..... युवक महोत्सवांमध्ये सुगम गायनामध्ये याच गीताला प्रथम क्रमांक मिळून साहित्यिक फ मु शिंदे यांच्या हस्ते आपला गौरव झाला. आपलं बोलणं चालू असताना मी आपल्याला आवडता पदार्थ विचारला तेव्हा आपले जिवलग मित्र श्री एकनाथ जोशी सर यांच्या मुखातून सहजच श्रीखंड असा शब्द निघाला. आपल्या आदर्श गुरूंची यादी खूप मोठी आहे पण त्यातही ज्यांचे प्रकर्षाने नावे घ्यावेत अशी महाविद्यालयीन जीवनातील श्री वानखेडे सर, पदुत्तर शिक्षणातील सु.भ.काळे सर त्यांच्यामुळे आपला विज्ञानाचा पाया पक्का झाला आणि ज्यांच्या मार्गदर्शनातून आणि नोकरी व्यवसायातून तुम्ही स्वतःला नवा आयाम देऊ शकलात ते तुमचे आदर्श गुरु कैलासवासी कर्मयोगी प्राचार्य डॉ. शिवाजीराव दळणर सर हे आहेत. आपण पुरस्काराचे धनी आहात. आपल्या आयुष्यामध्ये मिळालेल्या पुरस्कारांची यादी खूप मोठी आहे पण आपल्या घरातल्या सन्मानपत्रावर सहज नजर फिरवली तर काही पुरस्कार वलयांकित करावेत असे आहेत ज्यात राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप 2008, नॅशनल युथ असोसिएशन तर्फे मौलाना अब्दुल कलाम अवार्ड 2009, शिक्षक भूषण पुरस्कार २००९, महाराष्ट्र फाउंडेशन उपक्रमशील मुख्याध्यापक 2007, राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार 2022, राज्यस्तरीय विज्ञान - उपक्रमशील मुख्याध्यापक 2009 अशा कितीतरी पुरस्कारांची यादी आहे.आपण सरळसोट, अबोध,मस्तमौला,अवलिया,बिनधास्त, अन् स्वच्छंद जगता याचं कवतिक करावं तितकं कमी.
कैलासवासी शिक्षण महर्षी कर्मयोगी प्राचार्य डॉ.शिवाजीराव दळणर सर यांच्या अत्यंत कडक शिस्तीच्या जोखमीच्या तालमीत तुम्ही नोकरी केली.त्यानंतर १३ डिसेंबर २००४ ला मुख्याध्यापक म्हणून सेवा नाही तर व्रत धरलं.आपण काही वेळा शाळेत पाय ठेवायला उशीर केला असेल पण उशीर होतो म्हणून कधीच काढता पाय घेतला नाहीत.शिक्षकांनी तन,मन अन् धनानं कसं समर्पित व्हावं; हे आपल्याकडून शिकावं.आपल्या समर्पणाला आम्ही समजू शकलो नाही.आपल्या मुलांना विविध स्पर्धेतून तालुकास्तरीय राज्यस्तरीय विभाग तसेच राष्ट्रीय पातळीवर संधी मिळावी यासाठी आपण अहोरात्र मेहनत केली.विद्यार्थाला आकार देणारा.. स्वताः आकार घेतोय..!शिकवलेल्या प्रत्येक धड्याने, तुम्ही ज्ञानाची बीजे पेरली आहेत जी पुढील अनेक वर्षे फुलतील.तुमच्याकडं नियोजन आणि व्यवस्थापनाचा अभाव नव्हता तरीपण काही ठिकाणी आपल्याला अपयशी आलं,हे तुम्हाला मान्यच आहे. आपल्या जीवनात खडतर प्रवास आपली पाठ सोडायला तयार नव्हता पण तुम्ही त्यावर सहज विजय मिळवला. माझा मित्र कवी अनंत राऊत खूप छान लिहितो आणि मला वाटत कधी कधी आपल्या भावनांसाठीच रचना रचली असावी.
कधी जर सांडली स्वप्ने...
करून गोळा पुढे जावे...
जुने अवशेष स्वप्नांचे...
¹नव्याने जोडता यावे...
कुणाला यश मिळून जाते...
कुणाची जिंदगी जाते...
मिळालेल्या प्रवासाला,
तरी कुरवाळता यावे...!
हाती धरल्या कामात जीव किती अन् कसा ओतावा हे तर आपल्याकडूनच शिकावं. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यालयाच्या आरंभापासूनच आपण सोबत होतात.आपल्यामुळं अनेक कार्यक्रम देखणे झाले.आपण विद्यार्थी, मित्र,आप्त,सगे,सोयरे यांना सढळ मदत केली.जीव लावला; हे एकदम मान्य!पण आपण नोकरी अन् दुनियादारी करण्यात आपल्या प्रिय कुटुंबाला वेळ देऊ शकला नाहीत, हे आपल्याला मान्यच करावं लागंल.ही सेवानिवृत्ती आपणास यासाठीच मिळाली आहे.माय - दादांचे आशीर्वाद, भावा - बहिणींचं प्रेम ही आपली जायजात आहे.सौ. लता ताईंनी आपला संसार नेटका केलाय.थोरली कन्या पूजा फिजिओथेरपी करून तिचा वैद्यकीय व्यवसाय नेटाने चालवत आहे. सद्गुनी लेक प्रतिभा उच्चशिक्षित असूनही ती तिच्या भ्रताराचा संसार अतिशय आनंदाने चालवत आहे.धाकली कन्या पुनम परभणीतील नावाजलेल्या प्रेरणा महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर म्हणून तीचे कर्तव्य पूर्ण करते.खऱ्या अर्थानं आपला येल आता मांडवाला गेला आहे.आयुष्यात आलेल्या साऱ्यांना आपण प्रेम अर्पण केलंय,ते अनंत पटीनं आपल्याला मिळत राहील. सर आपला परिचय जुना आहे परंतु जवळून सहवास फक्त 14 महिन्याचा लाभला आहे या 14 महिन्यातून खूप काही आपल्याकडून मला शिकता आलं. आज तुम्ही 32 वर्षानंतर सेवानिवृत्त होत आहात एकीकडे आनंद तर दुसरीकडे डोळ्यात अश्रू आहेत पण असो...... आशा आपल्या संपूर्ण यशोगंधाने आपले जीवन असेच दरवळत राहो.
पाय मातीला खेळून राहू दे, मुठीमध्ये अवकाश येऊ दे
तवकीर्तीचा ध्वजा निरंतर, आकाशाच्या उंच जाऊ दे.
आपणास उद्याच्या सुंदर दिवसांसाठी आभाळभर सदिच्छा !
शब्दांकन : श्री.शिवशंकर डोईजड
विद्यार्थी तथा प्रशिक्षणार्थी सहशिक्षक

