परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) येथील शारदा महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्यावतीने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 648 वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. श्यामसुंदर वाघमारे तर प्रमुख उपस्थिती म्हणून अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. रमेश भालेराव व महाविद्यालयीन जयंतीच्या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.डॉ.अविनाश पांचाळ यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ.रमेश भालेराव यांनी संत रविदास यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला रविदास महाराज यांचा जन्म वाराणसी जवळ मांडुर या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रघुनंदन तर आईचे नाव करमादेवी असे होते, त्यांना विविध नावाने ओळखले जाते रुईदास, रोहिदास, रयदास, रविदास, त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या कार्यामुळे राज्यांमधील बोली भाषेचा प्रभाव त्यांच्या नावामध्ये झालेला बदल दर्शवतो, तसेच त्यांनी समस्त मानव जातीला "मन चंगा तो कठोती मे गंगा" , हा मानवतावादी संदेश दिला. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप करत असताना उपप्राचार्य प्रा. डॉ. शामसुंदर वाघमारे यांनी संत रविदास यांचे चाळीस दोहे शीख धर्मीयांचा पवित्र ग्रंथ "गुरुग्रंथसाहिब" या ग्रंथांमध्ये असून यांचे नियमित वाचन केले जाते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "अस्पृश्यता"हा ग्रंथ संत रविदास यांना अर्पण केला होता कारण रविदास महाराजांचे कार्य तत्कालीन परिस्थितीत महत्त्वाचे होते आणि आजही एकविसाव्या शतकातही त्यांच्या विचारांची गरज आहे असे प्रतिपादन केले. प्रा.डॉ.रत्नाकर कांबळे यांनी रविदास महाराजांच्या आर्थिक विचारावर भाष्य केले.
" ऐसा चाहू राज मै जहा मिले सबनको अन्न !
छोट बडो सब सम बसे रविदास रहे प्रसन्न !!"
या दोह्याच्या माध्यमातून भारतीय समाज व्यवस्थेमध्ये असणारी आर्थिक विषमता, श्रीमंत आणि गरीब यांच्यात वाढत चाललेली दरी आणि अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा ज्यांना पूर्ण करता येत नाहीत त्यांना आपण दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती असं म्हणतो तर अशा विषमतेमध्ये जगणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण भारतात मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून रविदास महाराज यांना लहान मोठा श्रीमंत गरीब अशा प्रकारचा कोणताही भेदभाव नको आहे, किमान सर्व लोकसंख्येला दोन वेळेचं अन्न मिळावं एवढी अपेक्षा संत रविदास महाराज करतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.रत्नाकर कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. अविनाश पांचाळ यांनी केले कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


