संपादकीय
संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध. बुद्धाच्या मानवतावादी विचारांचा प्रचार - प्रसार करण्यासाठी व धम्म दीक्षेसाठी भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 16 डिसेंबर 1956 रोजी महालक्ष्मी रेसकोर्स मैदान मुंबई येथे धम्म परिषदेचे आयोजन केले होते. परंतु तत्पूर्वी दिनांक 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपूर्ण राहिलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी जागतिक धम्म गुरु मा. दलाई लामा यांच्या प्रमुख उपस्थितीत व मा. ना. रामदास आठवले, अध्यक्ष - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) तथा केंद्रीय सामजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात आज दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 4 वाजता भव्य- दिव्य जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या करीता लाखोच्या संख्येने संपूर्ण भारतातून लोक रवाना झाले आहेत.
परंतू आज अचानक आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते समाजभूषण काकासाहेब खांबळकर यांनी या धम्म परिषदेचा जाहीर विरोध केला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, "भाजपा आणि RSS संघी लोकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नांवाचा वापर करुन बौध्द धम्मीय यांची दिशाभुल करत आहे." यात दिशभुल करण्यासारखे काय आहे हे त्यांनी स्पष्पणे सांगितले नाही.
पुढे ते म्हणतात, "या अगोदर सुध्दा असा प्रयत्न झाला होता, उद्या ही भाजपा आणि RSS संघी लोक स्टेजवर असतील ही बाब गंभीर आहे." आता यात गंभीर काय आहे आणि गंभीर बाब जरी असली तर ती घातक आणि निरूपयोगी आहे काय? तशी काही बाब असती तर वेगळी गोष्ट होती. भाजपा आणि RSS काय तर ब्राह्मण, ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू, शिख, पारशी, जैन इत्यादी सर्व जाती धर्माच्या लोकांनी तसेच सर्व संघटना यांनी सुद्धा सहभाग घेतला पाहिजेत आणि ते सुद्धा स्टेजवर आले व असले पाहिजेत तरच 'सारा भारत बौद्ध मय होईल.' यात शंका बाळगण्याची, घाबरण्याची व समाजाला घाबरवण्याची काहीच गरज नाही.
काका साहेब म्हणतात की, "जे लोक ही परिषद घेत आहेत ते खरे बौध्द नाहीत. त्यांचे घरांतील वातावरण हिंदुत्ववादी आहे. केवळ राजकीय फायदा मिळावा त्यासाठी ही परिषद आहे."
हा साफ खोटा आरोप आहे आजचे हिंदू व त्यांचे पूर्वज हे पूर्वीचे बौध्द होते हा खरा इतिहास आहे, धम्म दीक्षा पूर्वी आपणही अती शूद्र, अस्पृश्य हिंदू होतो आणि आता जे गैर-बौद्ध आहेत त्यांना या परिषदेच्या माध्यमातून बौद्ध दीक्षा दिली जाणार आहे. आम्ही ज्या उद्देशाने राजकारण करत आहोत तेच साध्य करत आहोत समाजाला सुद्धा हेच अपेक्षीत आहे, गैर काहीच नाही.
पुढे ते असे म्हणतात की, "मी या पुर्वी काही बौद्ध भिख्खू मोहन भागवत यांना जाऊन भेटले होते त्यांचा समाचार घेतला होता.
भन्ते राहुल बोधी यांनी भाजपा आणि RSS संघी कडुन खुप फायदे घेतले आहेत. त्यांना रेल्वेच्या फस्ट क्लास मधुन जाण्यासाठी पास उपलब्ध झाला होता. हे राहुल बोधी फक्त श्रीमंत लोकांसाठीच काम करतात गरीबांचे कार्यक्रमात जात नाही. असा त्यांचा पैसे उकळण्याचा उद्योग आहे. आशा भाजपा आणि RSS संघीचे सोबत ज्यांचे संबंध आहेत आशा लोकांपासून सावध रहावे." मला या बाबत काका साहेब यांना हे सांगायचे आहे की, मोहन भागवत काही बौद्ध भिख्खू यांना जाऊन भेटले किंव्हा काही बौद्ध भिख्खू भागवत यांना भेटले याचा अर्थ ते बौद्ध भिख्खू हे RSS चे झाले असा जर तर्क लावून आपण संबंध जोडला, तर मोहन भागवत हे बौध्द अनुयायी बनले असे सुद्धा म्हणता येईल, आणि आपण जर असेच संबंध जोडत गेलो तर आज भाजप केंद्र सरकार चालवत आहे म्हणजेच भारत देश चालवत आहे, भाजपला RSS चालवत आहे, आपण भारत देशात राहत आहोत, विविध सवलती, योजना, अनुदाण, मिळवत आहोत, नौकरीच्या माध्यमातून पगारी मिळवत आहोत का याचा अर्थ आपला सुध्दा भाजपा आणि RSS सोबत संबंध आहे? आणि मग आपल्या पासून कुठल्या लोकांनी सावध राहावं? काही बौद्ध भिख्खू यांनी बौध्द धम्म विपरीत काही कार्य केले असेल तर त्या बाबत योग्य कारवाई करण्यास भिख्खू संघ आहे. आरोपात तथ्य असल्यास ते योग्य भुमिका घेतील आणि एखाद्या व्यक्ती वर लावलेले आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो व्यक्ती दोषी आहे असे म्हणता येत नाही, हे न्यायाच सोप तत्व आहे. म्हणून आपले हे आरोप व आपला विरोध हाच मुळात राजकीय फायदा मिळवण्यासाठी आहे हे सिध्द होते.
पुढे असे म्हणतात की, "डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय बौद्ध महासभा, बौध्द जन पंचायत या संस्था अधिकृत आहेत. बौध्द महासभा चे अधिकृत कामकाज महा उपासिका मीराताई यशवंतराव आंबेडकर व डॉ. भिमराव आंबेडकर, डॉ. राहुलिया पहात आहे, तर बौद्ध जन पंचायत चे कामकाज आदरणीय आनंदराजजी यशवंतराव आंबेडकर पहातात, बाकी सर्व बोगस आहेत." असे म्हणून आपणच तथागत भगवान गौतम बुद्धास, बौध्द धम्मास, बौद्ध संघास, त्यांचा पवित्र विचारास संकुचित करुन मर्यादीत केले आहे. बौद्ध धम्म हा केवळ भरत देशा पुरता मर्यादित नाही बौद्ध धम्म हा विश्वव्यापक आहे. केवळ भारतातील आपण नमूद केलेल्या संस्थाच अधिकृत आहेत आणि बाकी सर्व बोगस आहेत असे आपणास म्हणता येणार नाही. बौद्ध धम्म हा विश्वाला तारणारा आहे हे संपूर्ण विश्वाने सुद्धा मान्य केले आहे. बौद्ध धम्म हा केवळ माझा आहे असे म्हणने चुकीचे आहे.
अविनाश कांबळे यांचा वर सुद्धा खोटे आरोप करत म्हणाले की, "त्यांनी अनेक लोकांना फसवले आहे. केंद्राच्या बोगस कमिट्या, अमाप पैसे घेऊन त्यांना लेटरहेड, व्हीजीटींग कार्ड, गाड्यांची नंबर प्लेट, ऑफिस चे नामफलक दिले आहेत, यांची पोलिस डिपार्टमेंट चौकशी सुरू आहे, आणि तेच आदरणीय दलाई लामा यांना बोलवून जनतेची दिशाभूल करत आहे. यांच्या पाठीशी भाजपा आणि RSS संघी मंडळी आहेत." हे पूर्णतः खोटा व राजकीय हेतू साध्य करण्यासाठी काकांनी असे म्हंटले असावे कारण वर नमूद केल्याप्रमाणे 'एखाद्या व्यक्ती वर लावलेले आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो व्यक्ती दोषी आहे असे म्हणता येत नाही.' अविनाश कांबळे यांची पोलिस डिपार्टमेंट चौकशी सुरू आहे असे आपणच म्हणता ते दोषी सिध्द झाले नाही आणि आरोप खोटे सुद्धा असतात, आणि वास्तविक पाहता आदरणीय दलाई लामा यांना मा.ना. रामदास आठवले यांनी स्वतः भेटून निमंत्रीत केले होते हे जग जाहीर आहे त्या बाबत बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्या आहेत. जनतेची दिशाभूल आपण करत आहात हे सुध्दा सिध्द झाले आहे. रिपाई आठवले पक्ष हा भाजपा सोबत महायुती मध्ये आहे हे सुद्धा जग जाहीर आहे, आणि जर आपेक्षे प्रमाणे रिपाई आठवले पक्षाने बौद्ध धम्म परिषद आयोजित केली तर सहाजिकच मित्र पक्ष म्हणून भाजपा आणि RSS संघी मंडळी बौद्ध धम्म परिषद यशस्वी करण्यास पाहिजे ते सहकार्य करतील, भाजपा आणि RSS संघी हे पाठीशी असणे स्वाभाविक आहे त्याचा बाऊ करण्याचे काहीच कारण नाही. भाजपा व RSS जर बौद्ध धम्म दीक्षा देण्याच्या कार्यक्रमास पाठीशी असतील तर ही बाब विरोध करण्याची मुळीच नाही.
पुढे काका साहेब म्हणतात की, "ज्या मनुवादीना डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी धडा शिकवून आपणास भगवान बुद्धाच्या ओटीत टाकले तो दिवस आठवा आणि RSS संघी पासुन आपल्या समाजाला वाचवा. "असे जनतेला आवाहन करतात, या वर शेवटी सांगतो की, ज्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपणास भगवान बुद्धाच्या ओटीत टाकले त्या वेळी भाजप अस्तित्वातच नव्हती आणि सत्ताधारी मनुवादी हे काँग्रेसी होते. भाजपा आणि RSS यांनी बौध्द धम्माची दीक्षा, स्विकार, प्रचार - प्रसार करत धम्म परिषदेत सहभाग घेतला तर विरोध न करता त्यांचे स्वागत व अभिनंदन करायला हवे, आणि तरच भारत बौद्ध मय होईल. काकासाहेब यांनी वैयक्तिक पूर्ववैमनस्यातून रिपाई आठवले पक्षा वर असलेल्या आकसा व रागा पोटी या धम्म परिषदेला विरोध केला आहे. पूर्णपणे राजकिय फायदा मिळवण्यासाठी केलेला केविलवाणी प्रयत्न आहे.
