परभणी, दि. १६ (समाजहित न्यूज वृत्तांत) — कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण, प्रतिबंध, मनाई व निवारणासाठी सन २०१३ मध्ये लागू करण्यात आलेल्या अधिनियमांतर्गत केंद्र शासनाने “शी बॉक्स” हे ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून पीडित महिलांना थेट तक्रार नोंदविता येते. या पोर्टलची वेब लिंक ([https://shebox.wcd.gov.in (https://shebox.wcd.gov.in)) सर्व मंत्रालयीन, क्षेत्रीय स्तरावरील शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनांनी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे. तसेच संबंधित संस्थांनी या लिंकचा प्रसार आपल्या अधिकृत सोशल मिडिया माध्यमांद्वारे करून सर्वसामान्य महिलांपर्यंत माहिती पोहोचवावी, असेही रंधवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नमूद केले आहे. या उपक्रमामुळे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि छळाच्या घटना प्रतिबंधित होण्यास मदत होणार असून महिलांना तक्रार नोंदविण्यासाठी एक सुलभ आणि सुरक्षित माध्यम उपलब्ध झाले आहे.

