ग्रामस्थ, विद्यार्थी, समाजसेवक आणि पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग
मानवत (समाजहित न्यूज वृत्तांत) – दिनांक १९ जुलै २०२५ रोजी मानवत तालुक्यातील वांगी गावात पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, शिक्षक, वृक्षप्रेमी, समाजसेवक तसेच मान्यवर अतिथींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. उदय खोडके (शिक्षण संचालक, वसंतराव नाईक कृषी महाविद्यालय, परभणी), डॉ. पी. आर. पाटील (माजी पशुवैद्यकीय अधिकारी), श्री. मकरंद भोगावकर (प्राध्यापक, कृषी महाविद्यालय परभणी), श्री. मंदार कुलकर्णी (अध्यक्ष, मराठी पत्रकार साप्ताहिक वृत्तपत्र संघ, परभणी) उपस्थित होते. तसेच संजय चौधरी, दिनकर चौधरी, विजय चौधरी, दत्तात्रय पाते, वाघ सर ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे कर्मचारी आणि वांगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शाळेच्या परिसरात विविध प्रकारची झाडे लावून पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. विशेष उल्लेखनीय म्हणजे वांगी गावातील पुरातन श्री राजराजेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गासाठी चौधरी कुटुंबाने आपल्या शेतातून रस्ता उपलब्ध करून दिला. या मार्गावर पिंपळ, वड, कडुलिंब यासारख्या प्रदूषण शोषण करणाऱ्या आणि ऑक्सिजनचा समृद्ध पुरवठा करणाऱ्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी वांगी झेडपी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय उपयोगी साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. हा उपक्रम सामाजिक जाणीव जागवणारा आणि पर्यावरण रक्षणासाठी प्रेरणादायी ठरला.




