"पँथर अभी जिंदा है"
पँथर भिमराव सावतकर यांची महाराष्ट्र शासनाच्या "डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी निवड
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाते. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने यावर्षीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी भिमराव सावतकर यांची निवड केली आहे. त्या बाबतचे पत्र सामाजिक न्याय मंत्री श्री. संजय शिरसाट यांनी दिनांक ५ जून २०२५ रोजी भिमराव सावतकर यांना पाठवून जाहिर केले आहे.
भिमराव सावतकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार हा राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिनांक १० जून २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट, मुंबई या ठिकाणी दिला जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री पँथर रामदास आठवले, श्री. एकनाथ शिंदे व श्री. अजितदादा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री श्री. संजय शिरसाट आदी यांच्या उपस्थितीत राहणार आहेत.
भिमराव यांचे कार्य नेहमीच समाजाला दिशादर्शक ठरले असून त्यांनी हाती घेतलेल्या कामामुळे समाजातील अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झालेला असल्यामुळे अतिशय महत्त्वाचा व प्रतिष्ठित मानला जाणारा हा पुरस्कार त्यांना जाहिर केला गेला आहे.
पँथर भिमराव सावतकर यांचा जिवन प्रवास सामाजिक कार्यासाठी खरोखरच प्रेरणादायी आहे.
पँथर भिमराव यांचे मुळगाव :
भिमराव नामदेव सावतकर यांचे कुंटूब मौजे देवसरी ता. उमरखेड जि. यवतमाळ या गावचे, देवसरी हे गाव मराठवाडा व विदर्भाच्या बॉर्डर वर आहे. पेनगंगा नदिच्या तिरावर बसलेले देवसरी हे गाव. पेनगंगा नदीच्या अलिकडे विदर्भ व नदीच्या पलिकडे मराठवाडा म्हणजे नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हामध्ये प्रशासकिय कारणास्त संबंध येतो, उमरखेड तालुक्यातील व त्या भागातील सर्व व्यवहार नांदेड मध्ये आहे. त्यांचा सर्व व्यवहार, नातेवाईक व त्यांची घरे नांदेड जिल्हयात आहेत. त्यांचे घर ही नांदेड येथेच आहे. भिमरावचा जन्म हा नांदेड जिल्हयातच झाला. भिमराव यांचे कुंटूब नांदेडहून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईला आले. त्यावेळी चातुर्वर्णाच्या चक्कीत भरडलेले सारे दलित कुंटूबे रोज मजुरीसाठी व पोटाची आग विझवण्यासाठी मुंबईकडे येत असत.
मुंबईतील दशा व शिक्षण
मुंबईतील हिंदूस्थान लिव्हर कंपनीच्या समोरील झोपडपट्टीत नांदेड जिल्ह्यातील त्यांचे नातेवाईक राहत होते. गावातल्या एका नातेवाईकांच्या ओळखीने गलिच्छ झोपडपटीत झोपडी वजा पाले ठोकले झोपडीत राहुन मिळेल ती रोज मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. भीमराव यांचे वडील अशिक्षित होते तरी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाला व यांच्या विचारला आपला दिपस्तंभ समजत होते, म्हणून त्यांनी आपल्या मुलाचे नाव भिमा न ठेवता भिमराव ठेवले होते. नाका कामगार व मजुर असलेल्या भिमराव सावतकराच्या "बा" ने भिमरावाला महानगरपालिकेच्या शिवडी येथील कोळी वाड्याच्या म्युनिसिपल शाळेत शिकायला पाठवले, शिवडी झोपडपटीतील मुला बरोबर भिमराव नगर पालिकेच्या शाळेत दाखल झाले. पोटाच्या भुकेपेक्षा भिमरावाची ज्ञानाची भुक मोठी होती. भिमरावचे शिवडी येथील कोळीवाड्यातील म्युलसिपल शाळेत प्राथमिक शिक्षण १ ली व ४ थी पर्यंत तर त्यानंतर शिवडी येथील मच्छिमार्केट मधील महानगरपालिकेच्या शाळेत ५ ते ७ वी पर्यंत शिक्षण घेतले.
नातेवाईकांच्या ओळखीने सायन कोळीवाडा येथील झोपडपट्टीत एक झोपडी त्यांच्या वडीलांनी विकत घेतले, परंतू तेथील झोपडपट्या महापालिकेने तोडून पालिकेने मालाड पश्चिम येथील वळणई वसाहतीत १० x १५ च्या झोपडपट्टीसाठी जागा देवून झोपडी बांधकाम करण्यास परवानगी दिली.
भिमराव यांचे कुंटूब मालाड येथे राहण्यास गेले, तो पर्यंत भिमराव ७ वी पास झाला होते. त्यांनी मालाड स्टेशन जवळील महापालिकेच्या शाळेत इयत्ता ८ वीला प्रवेश घेवून शिक्षण घेण्यास सुरुवात केली, परंतू मालाडला नविन राहायला आल्यामुळे भिमरावाच्या कुटुंबीयांना काम धंदा मिळत नव्हता, त्यांच्या कुटुंबीयांच्या बिकट आर्थिक परिस्थिती मुळे भीमराव यांनी मालवणी येथील महात्मा गांधी विद्यालय येथे ९ वी मध्ये प्रवेश घेतला परंतु तेथील शिक्षण संस्थेत शिक्षण बरोबर नसल्याने व शिक्षकही नसल्याने त्यांनी ९ वी च्या वर्गातून दाखला काढून जिथे वसतिगृहाची सोय आहे तिथे पालघर येथील शासकिय मुलांचे वसतिगृहात प्रवेश घेवून जीवन विकास विद्यामंदिर या शाळेत प्रवेश घेऊन १० वी उर्तीण केली. त्यानंतर ११ वी, १२ वी सायन्स मध्ये सिध्दार्थ महाविद्यालयात मुंबई येथे कवी व सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास गंब्रे यांच्या माध्यमातून घनशाम तळवटकरांना भेटून त्यांनी १२ वी सायन्स मध्ये प्रवेश घेतला.
दलित पँथरचा प्रवास
तर दुसरीकडे त्याच काळात दलित पँथरच्या लढ्याने मुंबईत वेग घेतला होता. चळवळीने भारलेल्या अनेक तरुणांनी चळवळीसाठी आपल तारुण्य दान करण्याचे ठरविले होते, अन्यायाचा प्रतिकार करणारी व आय-बहिणीचे रक्षण करुन सामाजिक प्रश्नाला हात घालणारी व जुन्या रुढी बंधनाच्या श्रृंखला तोडणारी चळवळ मुंबईतून खेड्याकडे पसरत चालली होती, पँथर चळवळ वर्ग वर्ण लढ्याच्या दिशेने कुच करुन निघाली होती. .
६ सप्टेंबर १९८२ रोजीचा नामांतर सत्याग्रहात भिमराव सावतकर, यांना तसेच नारायण लव्हाळे, नारायण लगाडे, नारायण शेगावकर, भगवान कांबळे यांच्या सह इतर असे २२ पँथर कार्यकर्त्यांना अटक करुन नागपाडा पोलिस ठाण्याच्या पोलिस कोठडीत डांबण्यात आले होते, त्यावेळी पोलिस वसाहतीतील पोलिस कर्मचा-यांच्या कुटूंबियांनी पँथर कार्यकर्त्यांना चहा-बिस्कीटे दिली होती. रात्री १२.०० वाजता त्यांना नाशिक जेल मध्ये एसटी महामंडळाच्या बसने नेण्यात आले. त्यांना ४ दिवस नाशिक जेल मध्ये ठेवून पँथर कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली. त्यावेळी नाशिक जेलमधील बराकतीमध्ये गोपीनाथराव मुंडे यांच्या सह अनेक समाजवादी चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यावेळी त्यांची जवळून ओळख झाली.
सन १९८७ ला भिमराव यांना कराड येथील प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये सिव्हील इंजिनिअरिंग साठी प्रवेश मिळाला. सिव्हील इंजीनियरिंग चा डिप्लोमा घेवून भिमराव "बा" चे स्वप्न पूर करणार होता. अठरा विश्व दारिद्र भोगणाऱ्या दलित कुटूंबाला दोन सुखाचा घास मिळणार असल्याचे स्वप्न भिमरावचे कुटूंब पाहत होते.
पँथरच्या विचाराने झपाटलेले अनेक तरुण अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी न्याय हक्क पदरात पाडण्यासाठी व जुन्या रुढी पंरपरा व माणूस घाण्या संस्कृतीचा अंत करण्यासाठी डोक्याला कफन बांधून शाळा कॉलेजचे शिक्षण सोडून रस्त्यावर उतरत होते. मुळात पँथर चळवळ अंगात भिनल्याने कराडला जावून ही भिमराव स्वस्थ बसले नव्हते, त्यांच्या आतला पँथर त्याला स्वस्थ बसू देत नव्हता, मुळात पँथर चळवळ अंगात भिनल्याने शिक्षणपेक्षा कराड व सातारा जिल्हयात तसेच सांगली जिल्हयातील इस्लामपूर, वाळवा, शिराळा, कडेगाव, विटा, पलूस, खानापूर, आटपाटी परिसरात भारतीय दलित पँथरच्या अनेक खेडयात, शहरात पँथरच्या छावण्या काढण्यासाठी व पँथरची बिजे पेरण्यासाठी अभ्यासाबरोबर चळवळीकडेही भिमराव लक्ष देत होते. उपेक्षित समाजाच्या लढ्यात खारीचा आपलाही सहभाग व वाटा असावा हि जान भिमरावाला होती, त्यांच्यातल्या बंडखोर पँथर त्यास स्वस्थ बसून देत नव्हता. कराड, सातारा सारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पँथरच्या सामाजिक क्रांतीचा विचार रागड्या सातारा जिल्हयात पेरावयाचे त्यांनी ठरविले. महाराष्ट्रात दलितावर होणाऱ्या अन्यायाची प्रतिक्रीया सातारा जिल्हयात उमटू लागल्या त्याचे श्रेय भीमरावांना जाते.
रोजच्या रोज अडले नडले लोक भिमरावच्या हॉस्टेलवर येत होते. पँथरची संघटना वाढविण्यासाठी भिमराव अभ्यासातून वेळ काढत कुणाच्या इनामी जमिनीचे काम, कुणावर झालेल्या अन्याय, अत्याचार, भिमराव तिथे हजर होऊन अत्याचार झालेल्याची भेट घेवून त्यांना न्याय मिळवून देणे पर्यंत स्वस्थ बसत नव्हते. तहसिलदार, गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलिसांकडील कामे त्यांनी केले. त्यामुळे सातारा जिल्ह्यात पँथरचा दरारा निर्माण झाला होता. पोलिस व इतर अधिकारी तात्काळ दखल घ्यायचे. दारात आलेल्या प्रत्येक बांधवांची भिमराव आस्थेने चौकशी करुन त्यांना जमेल तशी मदत करीत होते. कधी पदराची झळ सोसून तर कधी पायाची चाळण करुन.
सातारा जिल्ह्यात पँथरची स्थापना व कार्य
भिमराव हे इंजीनियरिंग चे शिक्षण घेण्यासाठी कराडला गेले असता भारतीय दलित पँथरचे नेते संघर्षनायक रामदास आठवले, प्रा. अरुण कांबळे यांच्या उपस्थितीत कराड बुधवार पेठेत पँथरच्या शाखेची स्थापना करुन, कराड तालुक्याच्या अध्यक्षपदी अशोक भोसले व सरचिटणीस पदावर भिमराव सावतकर यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. पँथर चळवळ वाढवत ते सातारा जिल्ह्याचे सरचिटणीस झाले. त्यानंतर त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या कार्यकारिणीवर चिटणीस या पदावर काम केले, त्यानंतर ते रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीवर सदस्य म्हणून काम करीत आहेत.
सातारा जिल्ह्यात कराड येथील बुधवार पेठेत पँथर नेते रामदासजी आठवले व प्रा.अरुण कांबळे यांच्या उपस्थित त्याने पहिली पँथरची छावणी ठोकली, दुसरी छावणी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्या ठिकाणी पहिली शिक्षण संस्थेची शाळा काढली त्या धोंडेवाडी काले गावी ग्रामीण भागात पँथरच्या छावणीची स्थापना केली. जातीयवादी शक्तीच्या विरोधात तिथला तरुण त्यांने आपल्या कर्तुत्वाने पेटविला, कराड मध्ये अशोक भोसले, शातांराम थोखडे, सुनिल लांदे, आनंद कांबळे, युवराज काटरे, मातंग समाजातील राम चांदणे, अनिल भोसले, श्रीरंग बडेकर, आप्पा गायकवाड, राजा भोसले, बनुबाई इवले, शंकर कांबळे, विजय थोरवडे, सुनिल, प्रमोद थोरवडे, अनिल सावंत, माजी नगराध्यक्ष अशोक शिवराम भोसले, मुस्लिम समाजातील कमरुउद्ददीन अल्ला उद्दीन, सजादभाई शेख, अलताफ शिकलगार, मुसा शेख, सिकंदर मुल्ला, मेहर समाजातील जयराम चव्हाण, होल्हार समाजातील बाळासाहेब जावीर, केंगार सर, डोंबारी समाजातील कमल लाखे, ढोर समाजातील बाळासाहेब शिंदे, आदि कार्यकर्त्यांना घेवून भिमराव यांनी पँथर चळवळ उभी केली.
भिमराव यांच्या जिद्द व चिकाटीने केलेल्या पँथर संघटनेच्या कार्यामुळे मातंग ढोर, बौध्द, डोंबारी, मुस्लिम, ओबीसी समाजातील पँथरचे बरेच कार्यकर्ते कराड नगर पालिकेत पँथर चळवळीमुळे नगरसेवक झाले. डोक्याला कफन बांधून अनेक बहुजन दलित युवक रस्त्यावर अन्यायाच्या विरोधात बंडाचा निशाण घेऊन चळवळीत उतरु लागले ते शक्य झाले केवळ भिमराव यांनी केलेल्या सक्रिय सहभागामुळे.
सातारा जिल्हयातील मागासवर्गीय ओ.बी.सी. यांच्या ज्वलंत प्रश्नावर अनेक आंदोलनाचे आयोजन करुन यशस्वी करुन भारतीय दलित पँथर व नंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष वाढविण्यात तसेच पक्षामध्ये विविध समाजातील कार्यकर्त्यांना विविध पदावर नेमून त्यांना नेतृत्व करण्याची संधी देऊन जिल्ह्यात फुले - शाहू - आंबेडकरी चळवळ गतीमान करण्यात भीमराव सावतकर यांचा सिंहाचा वाटा आहे. आज सातारा जिल्ह्यात सक्रिय कार्यकर्त्यांचे जे जाळे व नेतृत्व दिसत आहे ते भिमराव सावतकर यांच्या कार्याचा परिणाम आहे.
सातारा जिल्ह्यातील पँथर चळवळीमुळे अनेक नवे नेतृत्व उदयास आले त्यांत किशोर तपासे, अशोक गायकवाड, अमर गायकवाड, चंद्रकांत खंडाईत यांना दलित पँथर चळवळीच्या आक्रमक संघटनेत आणून त्यांना महत्वाची पदे व मान सन्मान देऊन पँथर संघटनेत काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात व नवीन नेतृत्व कार्यकर्त्यांचे जाळे तयार करण्यात पँथर नेते भीमराव सावतकर यांचे मोठे योगदान आहे.
पँथर कार्यकर्त्याच्या न्यायासाठी लढा व काँग्रेसला आव्हान
पाटण तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आटपून रात्री येराड या गावी जात असताना पँथर राम कांबळे या कार्यकर्त्याची तालुक्यातील राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी राम काबंळे यांच्या बरोबर शिलवंत मगरे, अशोक सरगडे, बौध्दाचार्य आदिजण जंयतीच्या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रम आटपून पाटणहून आपआपल्या गावी जात असताना राम कांबळे यांना एकटे गाठून त्यांना पाटण येराडच्या पुलाखाली आणून त्यांची हत्या करण्यात आली. हि बाब रात्री २.०० वाजता जे.डी. कांबळे, शिलवंत मगरे, बौध्दाचार्य यांनी कराडला येऊन भिमराव यांना सांगितली. सर्वजण तात्काळ पाटणला निघाले व खुन झालेल्या येराड येथील जाऊन पाहणी केली, त्याचवेळी रात्री एस.पी., डी.आय.जी. यांच्याशी फोनवर चर्चा करुन पोलिस यंत्रणेला तत्काळ तपासकामी लावले.पँथर राम कांबळे यांची हत्या काँग्रेस नेत्याने केल्याचे कळताच त्यांच्या विरुध्द तीव्र आंदोलन करण्यास सुरूवात केली असता त्यावेळचे आमदार विक्रमसिंह पाटणकर व पाटण पंचायत समितीचे सभापती माने व इतर कार्यकर्ते यांनी आंदोलनास विरोध दर्शवत पँथरने पाटण येथे आंदोलन व सभा घेऊनच दाखवावे असे वर्तमान पत्रात पत्र काढून जाहिर आव्हान वजा धमकी पँथर नेत्यांना दिली.
जिवाची पर्वा न करता लगेच दुस-या दिवसी पँथर नेते भिमराव सावतकर यांनी काँग्रेस नेत्यांचे पाटण येथे सभा घेण्याचे आव्हान स्वीकारले असल्याचे त्यांनी वर्तमानपत्रात जाहिर केले. पँथर रामदास आठवले, मनोहर अकुंश, राजा ढाले, किशोर तपासे, अशोक सरगडे, जे.डी. कांबळे, सोनावणे, चंद्रकांत अहिवळे, अशोक भोसले, शातांराम थोरवडे, अशोक गायकवाड, नंदकुमार कांबळे आदि पँथर कार्यकर्ते उपस्थित राहून पाटण येथे बस डेपोच्या जवळ जाहिर सभा घेऊन काँग्रेस नेत्याचे आव्हान जाहीरपणे पेलून दाखविले. कितीही मोठे आव्हान असो ते पेलण्याची धमक त्यांच्यामध्ये होती, असा निर्भिड बाणा भिमराव यांचा होता.
दलित पँथर चळवळ, मुंबई
भारतीय दलित पँथरच्या वळणई ओर्लेम मालाड (पश्चिम), मुंबई या पँथर छावणीच्या सरचिटणीस पदावर १९७८ ला त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. वळणई वसाहतीत, हनुमान नगर, कांदिवली येथील पॅथर नेते जी. एस. मोरे, ईराणीवाडीचे नारायण लव्हाळे, रामराव गाडे यांच्या उपस्थितीत मोनिकाबाई पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली वळणई पॅथर छावणीच्या अध्यक्षपदी भगवान कांबळे, संघटक पदी डेव्हिड गायकवाड यांची तर सरचिटणीस पदी भिमराव सावतकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पँथरच्या छावणीच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांच्या ज्वलंत प्रश्न, रेशनिंगकार्ड, पोलीस ठाण्यात अन्यायाचे प्रकरणे हाताळणे, झोपड्या तोडण्यात येऊ नये म्हणून मोर्चे - आंदोलन करणे, अन्याय अत्याचाराची प्रकरणे सोडविणे व आजुबाजुच्या झोपडपट्टी परिसरात पँथरच्या छावण्याची स्थापना करणे, नवीन कार्यकर्त्यांना पँथर चळवळीशी जोडणे अशी रोजची कामे भिमराव यांनी केली. संजय नगर, ईराणीवाडी, भाबरेकर नगर, चारकोप, संजय गांधी नगर, धनंजयवाडी आदि झोपडपट्टयांमधील जनतेची कामे करणे, जोगेश्वरी ते दहिसर घोडबंदर या विभागात पँथर छावण्या निर्माण करुन पँथर कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करून अनेक मोर्चे, आंदोलने यशस्वी करण्यात आली. विद्यार्थी दशेतच पँथर चळवळीत असल्याने सन १९८६ पर्यंत मुंबईतील पँथरच्या अनेक मोर्चे, आंदोलनात सहभाग घेऊन पँथर चळवळ वाढविण्यात भिमराव यांचा सिंहांचा वाटा आहे.
छावणीच्या सरचिटणीस पदावर कार्यरत असताना भिमराव यांनापँथर संघटन वाढीसाठी तसेच मोर्चे, आंदोलन विविध प्रश्न सोडविण्या बाबत रामदास आठवले रिपब्लिकन पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष-उमाकांत रणधीर, सरचिटणीस कमलेश यादव, प्रा. अरुण कांबळे, मनोहर अंकुश, गौतम सोनावणे, जी.एस. मोरे, मुरलीधर बनसोडे यांचे नेहमीच भिमराव यांना मार्गदर्शन लाभले.
रिडालोस ऐक्य ते दलित पँथरचे यश
रिडालोस ऐक्यानंतर दिनांक २७ मार्च १९८८ रोजी कराड येथील प्रिती संगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीजवळ सातारा सांगली, कोल्हापूर, जिल्हयातील दलित ओ.बी.सी. मुस्लिम भटके, मातंग समाजाच्या ऐक्य मेळाव्याचे संयोजक भीमराव सावतकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. हा मेळावा पँथर नेते रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे उद्घाटन कराड नगरीचे नगराध्यक्ष मा.पी.डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यास रामदास आठवले, प्रा. अरुण कांबळे, नामदेव ढसाळ, प्रा. जोगेंद्र कवाडे, भाई संगारे, विठ्ठल साठे, दिलीप जगताप, हुसेन दलवाई, छात्र भारतीचे प्रा. अर्जुन जाधव, चर्मकार संघर्ष समितीचे संतोष भोईर, पार्थ पोळके, गंगाधर आंबेडकर, दत्ता जाधव, प्रा. प्रज्ञावंत गौतम, विवेक कांबळे, आदि मान्यवर उपस्थित होते. रा.सु. गवई, प्रकाश आंबेडकर, गिरीश खोब्रागडे, राजा ढाले, गंगाधर पानतावणे यांनी पत्राद्वारे सावतकर यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
या ऐक्य मेळाव्याचे निमंत्रण अॅड. बी.सी. कांबळे यांना देण्यासाठी पाचगणी येथे ते गेले असता त्यांनी विरोध करुन त्यांना भेटणारे कार्यकर्ते भीमराव सावतकर मारुती सोनावणे, किशोर तपासे, अमर गायकवाड, विजय कांबळे, सुरेश मोरे, प्रकाश कांबळे, विठ्ठल कांबळे, दिलीप कांबळे, सुदाम बगाडे, हेन्ड्री जोसेफ, बालू गंगावणे, अनिल वन्ने, निम्मा जोसेफ, अशोक गायकवाड, विठ्ठल बगाडे, बळवंत कांबळे आदि कार्यकर्त्यांचा बी. सी. कांबळे यांनी अवमान करण्याचा प्रयत्न केला त्या अवमानातूनच पाचगणी येथे दलित पँथरची निमिर्ती करुन पाचगणी येथील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दलित पँथरची शाखा काढून पँथर वाढविण्याचा निर्णय घेऊन कराड येथे होणारा ऐक्य मेळावा यशस्वी करण्याचा संकल्प केला. ऐक्य मेळावा यशस्वी झाल्यानंतर पाचगणी नगर पालिकेत ४ नगरसेवक निवडून आले.
त्यानंतर महाबळेश्वर येथे पँथर शाखा काढण्यात आली महाबळेश्वर येथे जे.के. शिंदे, युसूफ शेख, सजाद वारुणकर आदि पीडी पार्ट मुस्लिम, दलित बहुजन समाज कार्यकर्त्यांनी नगर पालिकेत निवडून येऊन पँथरचे तसेच नंतर रिपब्लिकन पक्षाच्या अनेक परिषदा, अधिवेशन घेऊन यशस्वी केले.
जावळी तालुक्यातील मेढा येथे डॉ. संपतराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पँथरची स्थापना झाली. यावेळी विजय खरात, अनिल कांबळे, सिध्दार्थ परिहार, गौतम परिहार, उत्तम देवकर, विश्वनाथ गायकवाड, किसन शेकडे, निवृत्ती कांबळे, सौ सुशिला पवार, अर्जुन साळुंखे, दगडू जाधव, वसंतराव चव्हाण, पी.बी.मोरे आदि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने जावळी तालुक्यात दलित पँथरच्या माध्यमातून अन्याय अत्याचाराच्या घटनेला आळा घालून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मेढा ग्रामपंचायतीचे सरपंच पद संपतराव कांबळे यांनी भुषविले त्यांच्या बरोबर दगडू जाधव हे सदस्य निवडून आले.
सातारा जिल्हयातील विविध समाजातील ढोर, मातंग, चर्मकार, ओबीसी, भटके विमुक्त, मुस्लिम समाजातील कार्यकर्ते जिल्हयातील कराड, सातारा, पाचगणी, महाबळेश्र, फलटन, वाई, रहमतपूर, म्हसवड इत्यादी पालिकेत रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून आले. तसेच जिल्ह्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेत सदस्य निवडून आले.
मंडळ आयोग आणि आंदोलन
राज्यातील विचारवंत तकतिर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी प्रकरणी विरोधी भूमिका घेऊन प्रतिगामी चातुर्वर्णाच्या भूमिकेस पाठींबा दिल्या प्रकरणी त्यांच्या निषेधार्थ कराड शहरातून त्यांच्या प्रतिमेची प्रेतयात्रा काढून त्यांच्या प्रतिमेचे नवाकाळचे उपसंपादक बबन कांबळे यांच्या हस्ते दि. ६ सप्टेंबर १९९० रोजी दहन करण्यात आले. यावर मोठा वादही झाला होता. नवाकाळचे संपादक निळकंठ खाडीलकर यांनी संपादकीय लेखही लिहिला होता. त्यानंतर तर्कतिर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी ज्या वाई शहरात राहत होते. तेथे सुद्धा दि. २ ऑक्टोबर १९९० रोजी वाई शहरात अशोक गायकवाड, प्रकाश कांबळे यांच्या सह भीमराव सावतकर आदि कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांची प्रेतयात्रा काढून त्यांचा निषेध केला होता.
सामाजिक व शैक्षणिक हक्कांसाठी न्यायालयीन लढा
रिडालोस इन हिंदुइझम, राम अॅण्ड कृष्ण या पुस्तकावर राज्य शासनाने बंदी घालू नये म्हणून २० नोव्हेंबर १९८७ रोजी मुंबई उच्च न्यायालयात पँथर नेते प्रा. अरुण कांबळे व भीमराव सावतकर यांनी शासनाविरुध्द रिट याचिका दाखल केली होती.
राज्यातील विना अनुदान तत्वावरील तंत्रनिकेतन इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेणा-या अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकारची जी.ओ. आय. शिष्यवृत्ती व फ्री शिप मिळावी म्हणून तसेच सामाजिक न्याय विभागातील शासकीय वसतीगृहात प्रवेश देण्यात यावा म्हणून मंत्री, मुख्यमंत्री सचिव यांना निवेदन विनंती अर्ज करुनही न्याय मिळत नसल्याने सावतकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिनांक १६.६.१९८७ रोजी रिट याचिका नं. १५९१/१९८७ दाखल करुन राज्यातील विना अनुदान तत्वावरील शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क माफीची सवलत, शिष्यवृत्ती, फ्रिशिप, वसतीगृह प्रवेश मिळूवन देण्यात सिंहाचा वाटा आहे. मा. उच्च न्यायालयात प्रसिध्द वकील अॅड. नितीन प्रधान यांनी कोणतीही फी न घेता सामाजिक जाणिवेने काम पाहिले होते.
ओबीसी धम्म प्रवेश सोहळा
नागपूर येथील प्रा. उपरे काकांचे चिरंजीव संदिप उपरे आणि हजारो ओबीसी बांधवानी २५ डिसेंबर, २०१६ रोजी दिक्षाभूमी नागपूर येथे भन्ते सुसाई यांच्या उपस्थित धम्म प्रवेश सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास सहभागी होण्यासाठी आलेल्या ओबीसी बांधवांची राहण्याकरीता आमदार निवासात व्यवस्थाकरुन अन्य नियोजनात सहभागी होऊन सावतकर यांनी निस्वार्थीपणे मदत केली. या वेळी आदरणीय राजा ढाले, आर. के. गायकवाड, संदिप जावळे, रमेश कटके, अरुण जावळे, पल्लवी गजभीये यांचा धम्म प्रवेश सोहळयाच्या नियोजन प्रक्रियात सहभाग होता. यावेळी विशेषः पल्लवी गजभीये यांचे ओबीसीचे धर्मात्तर सोहळा या पुस्तकाचे उद्घाटन सुद्धा संदिप उपरे यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तक उद्घाटनात नागपूरचे स्थानिक संयोजक यांचा विरोध असतानाही, संदिप उपरे यांच्या हस्ते पुस्तकाचे स्टेजवर उद्घाटन करुन प्रकाशन केले.
राष्ट्रीय नेते कांशीराम यांची भेट :
कराड येथील शासकिय विश्रामधाम मध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते आदरणीय कांशीराम साहेब आले असता, क्रांतीवीर नागनाथ नायकवाडी यांनी भिमराव सावतकर यांची रेस्ट हाऊस येथे पँथरचे नेते अशी ओळख मा. कांशीराम यांच्याशी करुन दिली. असताना कांशीराम साहेब निघाले होते परंतू ते थांबले. पँथर कार्यकर्त्यांची विचारपूस करुन भिमराव सावतकर व आदी कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी चर्चा केली, त्यावेळी सावतकर हे काशिराम साहेबांना म्हणले की, "आप तो हमारे नॅशनल लीडर है, महाराष्ट्र मे रामदासजी आठवले साहेब हमारे नेता है" पँथर चळवळी सह विविध सामाजिक विषयावर कांशीराम साहेबांनी चर्चा केली. या वेळी क्रांतीवीर नागनाथ नायकवाडी, प्रा. सुनिल वाघमारे, संदिप जवाळे, आनंदा कांबळे, बाळासाहेब जावीर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
पालिका ते विधीमंडळ व मंत्रालय मार्फत सामाजिक कार्य
सावतकर यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता या पदावर काम केले आहे. त्यानंतर मा. ना. दयानंद म्हस्के, राज्यमंत्री गृहनिर्माण व मा.ना. अॅड. प्रितमकुमार शेगावकर राज्यमंत्री, गृहनिर्माण तसेच खासदार श्री. राजीव सातव माजी राष्ट्रीय अध्यक्ष युवक काँग्रेस यांच्याकडेही स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे. मा. मंत्री श्री. शिवाजीराव मोघे हयांचे जावई हिंगोली जिल्हयातील कळमनुरी मतदार संघाचे आमदार डॉ. संतोष टारफे यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून मंत्रालय व विधी मंडळातील कामकाज पाहत होते सध्या ते आमदार संतोष बांगर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून मंत्रालय व विधि मंडळातील कामकाज पाहत आहेत.
राज्यातील विधी मंडळातील अनुसूचित जाती - जमातीचे आमदार व मंत्रालयीन अधिकारी यांच्या प्रत्येक विधीमंडळ अधिवेशनापूर्वी बैठका घेऊन राज्यातील अनुसूचित जाती जमातीचे ज्वलंब प्रश्न विधीमंडळात मांडून ते सोडविण्यासाठी त्यांच्या चर्चा घडवून आणण्यासाठी व त्यांच्या प्रश्नांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात. मंत्रालयीन व विधी मंडळात गेली २५ वर्षापासून ते कार्यरत आहेत.
अंतराष्ट्रीय स्तरातील सामजिक कार्य व कार्यक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडन येथे शिक्षण घेत असताना बाबासाहेब ज्या घरात रहात होते ते घर राज्यशासनाने विकत घेऊन त्याठिकाणी बाबासाहेबांचे स्मारक बनविण्याकरीता शासनाला भाग पाडण्यासाठी माजी सनदी अधिकारी आर. के. गायकवाड, रमेश कटके, लंडन येथील संतोषदास मॅडम तसेच गौतम चक्रवर्ती आणि हरबन्स विरदी, शासनाचे उपसचिव श्री. दिनेशजी डिंगळे यांच्या सह भिमराव सावतकर यांनी यशस्वी प्रयत्न केले.
लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घराच्या हस्तांतर सोहळ्यात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मा.ना. रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. ना. राजकुमार बडोले, मा. सुलेखाताई कुंभारे, आमदार डॉ. संतोष टारफे, अविनाश कांबळे, चंद्रशेखर कांबळे यांच्यासह आर. के. गायकवाड, रमेश कटके, लंडन येथील संतोषदास मॅडम तसेच गौतम चक्रवर्ती आणि हरबन्स विरदी व भिमराव सावतकर हे ही उपस्थित होते.
दिनांक १४ एप्रिल २०१८ रोजी अमेरिकेत युनायटेड नेशनच्या कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती कार्यक्रमास रमेश कटके, स्नेहा भालेराव, अभिजित सावतकर सह भीमराव सावतकर उपस्थित होते. अमेरिकेच्या दौ-या वेळेस कोलंबिया विद्यापीठातील लायब्ररीस त्यांनी भेट दिली तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयास अभिवादन करण्यासाठी भिमराव सावतकर, चंद्रशेख कांबळे, अविनाश कांबळे, स्नेहा भालेराव, अभिजित सावतकर हे उपस्थित होते.
कोरिया येथील डब्ल्यू.एफ. बी. इंटरनॅशनल कॉन्फरन्स, या जागतिक धम्म परिषदेला दिनांक ८ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २००७ ला पँथर नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री अॅड. प्रितमकुमार शेगावकर, भिमराव सावतकर, अविनाश कांबळे, भन्ते राहुल बोधी आणि एअर इंडियातील भालेराव अॅड भोसले, आदींचे शिष्टमंडळे डब्ल्यू.एफ.बी. इंटरनॅशनल कॉन्फरन्सला अमेरिका, थायलंड, श्रीलंका येथे ते उपस्थित होते.
पँथर भिमराव सावतकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराचे खरे मानकरी
भिमराव सावतकर हे विद्यार्थी दशेपासूनच पॅथर चळवळीशी निवडीग असून, पँथरच्या विविध पदावर कार्यरत आहेत. सध्या ते मा. ना. रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत.
भिमराव यांनी पँथरच्या माध्यमातून आयुष्यभर महिला, दलित,आदिवासी, ओबीसी, सर्व समाजातील उपेक्षित, वंचित व दुर्बल घटकांच्या न्याय हक्कासाठी तसेच शिक्षणासाठी स्वतःच्या भविष्याची व जिवाची पर्वा न करता लढा देऊन त्यांना हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र आयुष्यभर यशस्वी लढा दिला भिमराव यांचे निर्भिड समाज निर्मितीसाठी मोठे योगदान आहे. भिमराव यांचे कार्य नेहमीच समाजाला दिशादर्शक ठरले असून त्यांनी हाती घेतलेल्या कामामुळे समाजातील अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झालेला असल्यामुळे अतिशय महत्त्वाचा व प्रतिष्ठित मानला जाणारा हा पुरस्कार त्यांना जाहिर केला गेला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार हा केवळ एक सन्मानच नसून समाजातील महिला, दलित,आदिवासी ओबीसी तसेच सर्व समाजातील उपेक्षित, वंचित व दुर्बल घटकांसाठी दिलेल्या आजपर्यंतच्या योगदानाची ही पावती आहे. यापुढेही त्यांचे कार्य असेच अविरतपणे सुरु राहील व समाजातील युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल याची सर्वांना खात्री आहे.
या पुरस्कारामुळे नक्कीच भिमराव सावतकर यांचे सुद्धा मनोबल उंचावून ते पुढील सामजिक कार्य अतिशय उत्साहाने करतील यात तिळमात्र शंका नाही कारण "पँथर अभी जिंदा है"
"भिमराव सावतकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराचे खरे मानकरी" आहेत. पँथर भिमराव सावतकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार २०२५ साठी निवड झाल्या बद्दल समाजहित न्यूज महाराष्ट्र यांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा !
_________________________________________________
संकलन व लेख:
ऍड. सुभाष अशोकराव अंभोरे दूधगावकर,
कार्यकारी संपादक, समाजहित न्यूज महाराष्ट्र राज्य
9284714499














