परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) : चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर व आवश्यक प्रमाणात पीककर्ज उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी सर्व बँकांनी योग्य समन्वयाने विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हास्तरीय बँकिंग समन्वय समितीच्या बैठकीत खरीप पीककर्ज वाटप, नोंदणीकृत शेतकरी, कर्ज पात्रता आणि आर्थिक समावेशनाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी नाबार्डचे एस. के. नवसारे,आरबीआयचे (क्रेडीट अँड एनपीएचे) अभय वानखेडे, एलडीएम आर. एन. अकुलवार, राजेंद्र कानीशेट्टी, संजय भालेराव, सुनील दरेकर, श्री. हट्टेकर, ‘आरसेटी’चे जितेंद्र कुशवाह, रमणकुमार सौदागर यांच्यासह बँकांचे अधिकारी, प्रमुख बँकांचे प्रतिनिधी, महामंडळांचे जिल्हा समन्वयक, तसेच विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आदेशित केल्याप्रमाणे प्रत्येक बँकेने आपापल्या शाखांमधून शेतकऱ्यांची पीक कर्ज प्रकरणे प्राधान्याने मंजूर करावीत. शेतकरी ऐन खरीपाच्या तोंडावर आर्थिक संकटात सापडलेला असतो. त्यामुळे बँकांनी प्रत्येक गावात जावून पीककर्ज वाटपासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे. त्या शिबिराबाबत शेतकऱ्यांना पूर्वीच कल्पना द्यावी. त्याचे तसे नियोजन करून प्रसिद्धी करावी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विनाविलंब आणि अडथळ्याशिवाय तात्काळ कर्ज देण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी यावेळी बँक व्यवस्थापकांना दिले.
पीककर्ज वाटपाचा दर 15 दिवसाला घेणार आढावा--
यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी खरीप पीककर्ज वाटपासंबंधी प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करून मंजुरी व वितरण सुनिश्चित करावे. शेतकरी अडचणीत सापडणार नाही. शेतकऱ्यांना अन्य बँकांतील कर्जामुळे अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता बँकांनी घ्यावी, असे सांगून यासाठी दर 15 दिवसाला बँक अधिकाऱ्यांसोबत आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘खरीप हंगामात एकही पात्र शेतकरी कर्जाविना राहता कामा नये. बँका, शासन व महामंडळांनी एकत्रितपणे काम करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत पोहोचवावी. ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,’ असेही जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करताना बँकांनी कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. त्यांना विनासायास पीककर्ज उपलब्ध करून देण्याची कार्यवाही पूर्ण करावी. त्यासाठी बँकांनी गावोगावी जावून पीककर्ज वाटपासाठी विशेष शिबिरांच्या माध्यमातून पुढाकार घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज दिले. आज डिसेंबर 2024 मधील पीककर्ज वाटप आढावा बैठकीचे इतिवृत्त सादर करण्यात आले असून, सर्व बँकांनी याची नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत. या बैठकीत शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पीककर्ज वाटप सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना ठरवण्यात आल्या. पीककर्ज वाटपासाठी बँकांनी आपापल्या स्तरावर नूतनीकरण मोहीम राबवावी आणि विशेष शिबिरांचे आयोजन करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
सर्व बँकांनी विहित कालमर्यादेत पीककर्ज वाटपाची प्रक्रिया पूर्ण करणे ही प्राथमिक जबाबदारी असून तशी कार्यवाही तत्काळ करावी. संबंधित बँकांनी या महिन्यातच आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. डिसेंबर 2024मध्ये पार पडलेल्या जिल्हास्तरीय समन्वय बैठकीत पीककर्ज वाटप, बँकिंग सेवा विस्तार, जनधन योजना तसेच विविध आर्थिक विकास योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीच्या प्रारंभी डिसेंबर महिन्यातील पीककर्ज वाटप इतिवृत्तावर चर्चा करण्यात आली.
विविध आर्थिक विकास महामंडळांचे जिल्हा समन्वयक यांनी बँक शाखा व्यवस्थापकांशी थेट संपर्क साधून प्रलंबित प्रकरणांचा सुसंगत पाठपुरावा करावा, असे सांगून विविध योजनांतील कर्जाचा आढावा घेण्यात आला. ज्या बँकांची कर्ज वितरणातील प्रक्रिया अत्यंत कमी आहे, अशा बँकांनी कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी ‘आरसेटी’ने तयार केलेल्या वार्षिक कर्ज आराखड्याचे अधिकृत विमोचन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

