परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) दिनांक 10 जून 2023 रोजी सकाळी 10.00 वाजताचे सुमारास फिर्यादी महिला ही घरातील काम आवरून गावातील नदीत कपडे धुण्यासाठी गेली असतांना आरोपी माधव ज्ञानोबा काळे रा. सारोळा बु ता. पाथरी जि.परभणी हा तेथे आला. तेव्हा त्यांनी आजूबाजूला पाहीले असता तेथे कोणीही नव्हते. फिर्यादी कपडे धुत असतांना आरोपीने फिर्यादीचे पाठीमागुन येवुन अचानक वाइट हेतुने डावा हात धरून म्हणाला की, तु मला खुप आवडतेस असे म्हणाला. तेव्हा फिर्यादी त्यांना म्हणाले की, मला नवरा व लेकरेबाळ आहेत, संसार आहे, तुम्ही माझा नादाला लागु नका असे म्हणाले व माझा हात त्याचे हातातुन हिसकावुन सोडवुन निघुन घरी आले वगैरे फिर्याद वरून पोलीस स्टेशन पाथरी येथे गु. र. नं. 241/2023 कलम 354 (अ) भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करून पोलीस हवालदार पिंपळपल्ले यांनी तपास करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर गुन्ह्यात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. आज दिनांक 08 मे 2025 रोजी मा.जयक्रांती पांचाळ यांच्या न्यायालयाने नमूद आरोपीस कलम 354 (अ) भारतीय दंड संहिता अन्वये दोषी ठरवून एक वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सदर खटल्यामध्ये सरकारी अभियोक्ता म्हणून श्री ए एच सोनकांबळे यांनी काम पाहिले तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस अंमलदार प्रल्हाद दुधाटे यांनी मदत केली.

