'अवैध व्यवसाय विरोधी अभियान -१'
परभणी - नांदेड (समाजहित न्यूज वृत्तांत ) दिनांक १ मे ते ३१ मे, 2025 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात 'अवैध व्यवसाय विरोधी अभियान-१' चे आयोजन करण्यात आले आहे. परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध दारू, मटका, जुगार, ऑनलाइन लॉटरी, क्रिकेट बेटिंग, गुटखा, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, वाळू उपसा व वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक इत्यादींना आळा घालण्याकामी व्यापक मोहिमेची आवश्यकता लक्षात घेऊन, दिनांक १ मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत 'अवैध व्यवसाय विरोधी अभियान-1' चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मोहिमेत, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, अंमलदार यांचेसह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व अपर पोलीस अधीक्षक हे सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे, स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पोलीस पथके ही देखील कारवाईत सहभागी झाली असुन, संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी अवैध व्यवसाय विरोधी कारवायांवर वैयक्तिक देखरेख ठेवली आहे. सदर मोहिमेदरम्यान पहिल्या दोन आठवडयात (813) अवैध व्यावसायिकांविरुध्द (803) कारवाया करण्यात आल्या होत्या व या दरम्यान एकूण 2,33,95,360/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.
या अनुषंगाने दि. 15.05.2025 ते दि. 21.05.2025 पावेतो नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या चारही जिल्हयांत अवैध व्यवसायांविरोधात मटका जुगार, गांजा, अवैध दारु, वाळू व इतर संबधाने कारवाया करण्यात आल्या आहेत. चालू महिन्यात दिनांक 15.05.2025 ते दिनांक 21.05.2025 पावेतो म्हणजे मोहिमेच्या तिसऱ्या आठवडयात परिक्षेत्रात (467) अवैध व्यावसायिकांचे विरुद्ध एकूण (373) केसेस करण्यात आल्या असून एकूण 4,48,60,955/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यामध्ये प्रामुख्याने स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी पोस्टे उस्माननगर हद्यीमध्ये केलेली वाळू विरोधातील कारवाई व पोस्टे देवणी जि. लातूर यांनी गांजाच्या लागवडीविरोधात केलेल्या कारवाईचा समावेश आहे. परिक्षेत्रातील अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी देखील वैयक्तिकरित्या अवैध व्यवसायांविरुध्द (51) कारवाया केल्या आहेत. उपरोक्त कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाच्या nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर कळवून अशा अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी आपला हातभार लावावा, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.




