स्वतःच्या स्वार्थासाठी आत्मकेंद्री बनत गेलेल्या माणसाने मानवतेला हतबल करून दानवतेशी सख्य केले आहे. त्यामुळेच निरपराधांना बेछूट गोळीबारातून रक्तांच्या थारोळ्यात झोपवणारे आत्मघातकी हल्ले सुरू झालेले आहेत.परवा काश्मिरमधील पहेलगाममध्ये दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांवर केलेल्या गोळीबाराचे कौर्य हा देशाच्या अस्मितेवर झालेला आघात होता.या हल्ल्यांचा जाहिर निषेध व्यक्त झालेला आहे.मानवतेवर झालेला एक भयानक हल्ला होता.असे हल्ले घडवून भारतात आणि जम्मू-काश्मिरमध्ये शांततेला आव्हान देऊन सतत अशांतता धुमसत ठेवण्याचे दहशतवाद्यांचे प्रयत्न सतत सुरू असतात.परंतू परवा झालेला हल्ला हा पुलवामामध्ये आरडीएक्स स्फोटानंतरचा सर्वात मोठा हल्ला होता.लष्कर - ए- तोयबाशी संबंधित टीआरएफ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.एवढेच नाही तर "पंतप्रधान नरेन्द्र मोदींना हा आम्ही केलेला हल्ला आहे म्हणून जाऊन सांगा" असा मग्रूरपणा सुध्दा केलेला आहे. एवढा उघड संदेश म्हणजे छपन्न इंचीला दिलेले आव्हान आहे. यातून काय धडा घ्यायचा तो सत्ताधाऱ्यांनी घ्यावा.कारण बुध्दीवादाच्या कक्षा ह्या त्यांच्यानंतर धुसरच झालेल्या आहेत असे ते नेहमी समजत असतात. पुलवामाचा हल्ला लोकसभा निवडणूकांचा पूर्वसंध्येला घडला होता.तसाच हा सुध्दा हल्ला बिहार निवडणूकांपूर्वी झालेला आहे.या चिंतनिय विषयाकडे आता देशाचे लक्ष केंद्रीत झालेले आहे.त्यामुळे जनतेचे ते सुध्दा लक्ष विचलित करण्यासाठी आता काय होईल हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.
"शांततेशिवाय मानवी आयुष्ये कुणा लाभली" शांततामय सुलभ पध्दतीने जीवन जगून विकासाच्या दिशेने जाण्यासाठी देशात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होणे ही सर्वात मोठी महत्वाची क्रांतिकारी पाऊले ठरणार आहेत .त्यासाठी काय करावे लागेल?कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील? या प्रश्नांवरील चिंतनातून प्राधान्याने निश्चित कृतिशील कायम करणे हे केन्द्र सरकारचे आद्यकर्तव्य आहे.परंतू हा विचार सोडून फक्त राजकारण आणि सत्तेच्या विस्तारीकरणासाठीच पूर्ण शक्ती खर्च होत असेल तर देशातील निरपराधांवर असेच हल्ले होत राहणार आहेत.मग संरक्षण आणि गृहखाते काय करते हे प्रश्न विचारण्याचा संविधानिक अधिकार जनतेला निश्चितच आहे. हल्ले होतात,देशातील माणसं मरतात.मग मदतीच्या रक्कमा देऊन कोरड्या सहानुभूतीने ही प्रकरणं विसरायला भाग पाडलं जातं.कारण येथे माणसाच्या सांडणाऱ्या रक्तापेक्षा सत्ता काबिज करून ति वर्षानुवर्षे ताब्यात ठेवणे या राजकीय मतलबाला फक्त किंमत आहे. जिथे जिथे १०- १२ वर्ष शांतता राहिली. तिथले सैन्न्यदल आणि पोलिस दुसरीकडे हलविल्यानंतरच त्या बेसावधतेचा फायदा घेऊन यापूर्वी आतिरेक्यांकडून असेच हल्ले झालेले आहेत.मग हि ठेच लागल्यावर सुध्दा शांततामय भागातील सैन्न्य आणि पोलिस दुसरीकडे घेऊन जाणे हे केन्द्र सरकारच्या गृहविभागाचे फार मोठे शहाणपण समजावे काय? असं केल्यानंतर संधी शोधणाऱ्या अतिरेक्यांकडून हमखास हल्ले होणारच हा पूर्वानुभव गाठीशी असल्यावर सुध्दा सैन्न्य हलविण्याची पूनरावृती कशासाठी करण्यात आली ? याचे उत्तर केंद्रशासनाने देशातील नागरीकांना दिले पाहिजे.
दक्षिण काश्मिरमधील अनंतगाम जिल्ह्यातील पहलगाम पासून ६ किमीवरील बॕसरन व्हॅली या पर्यटनस्थळावर झालेला हा आत्मघाती हल्ला होता. ४० पेक्षा जास्त पर्यटकांच्या गटावर २-३ अतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार केला.त्यात २६ जणांचा मृत्यू तर झाला,तर २० हून अधिक जखमी झाले. त्यांनी धर्म विचारत फक्त पुरूषांना लक्ष केले असं म्हणतात.मुळातच अतिरेकी हे सुध्दा कडवे धर्मांधच असतात.म्हणून आपण सुध्दा अधिकाधिक धर्मांध होत राहून छाती फुगवत राहण्यात का हशिल आहे? त्या उन्मादाला जगात प्रदर्शित करण्यात अभिमान बाळगणे म्हणजे मानवी समाजावरील संकटांना अधिक गडद करण्यासारखे ठरत नाही का? समाजातील माणसं ही आज स्वार्थांध होत चालली आहेत.राजकारणी अधिकाधिक महत्वाकांक्षी होत चाललीत. सत्ताधारी सुध्दा विरोधकांचे अस्तित्व उखडून टाकण्यासाठी धर्म आणि जातीच्या नावावर वेगवेगळे डाव रचून जनतेला संमोहित करण्याचे कारनामे फक्त करत आहेत."गर्व से कहो" म्हणत सामाजिक सद्भाव,शांतता आणि मानवतेला जबर आव्हानं दिली जात आहेत.आपल्या विपरीत वागण्याचे परिणाम काय होतील याची चिंता वाहण्याचे कर्तव्य सत्ताधारी पक्षाचे नेतेच आज विसरलेले आहेत.काहीही करून निर्माण केलेल्या लाटांवर आरूढ होत देशावर अधिराज्य गाजवायचे.मग त्यातील विपरीत परिणामांनी त्या देशातील निरपराध माणसांचे काहीही झाले तरी त्यांच्या जीवनाचे कुणाला काहीच देणे घेणे उरलेले नाही. देशातील या चुकीच्या प्रवाहातील फटक्यांनी धर्मांधता निर्माण करून ईतर धर्मियांना असुरक्षित करणे या उफराट्या वाटचालीनेच मानवतेला संकटात आणलेले आहे.परंतू हे दुष्परिणाम हेच सत्त्य आहे हे पटल्यावर सुध्दा या देशातील एक संमोहित गट आजही हे सत्त्य मान्य करण्याच्या मन:स्थितीत नाहीत.हेच त्यांचे स्वतःच्या अंतरात्म्याशी सुरू असलेले स्वार्थी व्दंव्द आहे.यामुळेच हे दहशतवादी "तुमच्या पंतप्रधानांना जाऊन सांगा" म्हणत देशातील या अतिरेकी उन्मादाचे हेच ते परिणाम पटवून देण्यासाठी सांगून हल्ले घडवित आहेत.देशातील अराजकता ही वाढत जात आहे. बाहेरील विध्वंसक दहशतवादी शक्तीकडून हे अंतर्गत धार्मिक उन्मादानेच मानवतेवर होणारे क्रूर हल्ले आहेत....!
==============================
संजय एम.देशमुख,निंबेकर ( ज्येष्ठ पत्रकार) अकोला
मोबा.क्र.९८८१३०४५४६, E- mail-- sanjaymdeshmukh11@gmail.com
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

