नांदेड (समाजहित न्यूज वृत्तांत ) दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात नांदेड शहरातील व्यापारी व व्यावसायिकांची बैठक पार पडली. सदर बैठकीस शहरातील विविध व्यापारी व व्यावसायिक संघटनांचे सुमारे 50 प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत, व्यापारी व व्यावसायिकांनी आपापल्या समस्या मांडल्या, यात नांदेड शहरातील रहदारीची समस्या, रस्त्यांची कामे, अतिक्रमणे, फेरीवाले, ऑटो रिक्षा, गुन्हेगारी इत्यादी बाबत प्रतिनिर्थीनी मोकळेपणाने आपले विचार व्यक्त केले. उपस्थितांना पोलीस अधीक्षक श्री अबिनाश कुमार व पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी, शहरातील विविध विभागांना विश्वासात घेऊन, कालबद्ध पद्धतीने सदर समस्यांची सोडवणूक करण्याचे निश्चित करण्यात आले. रहदारीच्या समस्यांसाठी दिनांक ५ मार्चपासून व्यापक मोहीम राबविण्याचे देखील पोलीस विभागाकडून सुचित करण्यात आले. पुढील पाठपुराव्यासाठी, व्यापारी व व्यावसायिकांची तीन महिन्यानंतर पुन्हा बैठक घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

