परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) येथील अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीने काव्य मैफलीचे आयोजन व्यंकटेश नगरातील पोद्दार जंबो किड्सच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय शैक्षणिक महासंघाचे महामंत्री प्रा.डॉ.ज्ञानोबा मुंढे, कवी महेश देशमुख, प्रेमेंद्र भावसार, भानुदास धोत्रे, दीपक कुलकर्णी, राम जोशी व डॉ. एन. व्ही. सिंगापुरे उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक कवींनी आपली एक रचना काव्य मैफिलित सादर केली. यावेळी कवी प्रेमेंद्र भावसार आपल्या कवितेतून आपली मुलं मोठी झाल्यास शिक्षण व नोकरीसाठी बाहेरगावी गेल्यास घराची व घरातील माणसांची काय अवस्था होते याचे यथार्थ वर्णन करताना म्हणतात,
घरातली पाखरं शहाणी-सुरती होण्यासाठी मोठ्या शहरात काय गेली,
जणू घरातलं घरपणच घेवून गेली...
घरातील अस्ताव्यस्तपणा जाऊन नीटनेटकेपणा येतो आपल्या लेकरांची ओढ आठवण सतावत राहते, मुले घरीआल्यास काय होईल, हे सांगत शेवटी कवितेतून म्हणतात..
तो क्षण ,ती भेट देईल उडत्या पाखरांना विसाव्याचे कण, भरून घेतील यथेच्छ त्यांचे मन ..घरट्यातल्या प्रत्येक गोष्टींना केलेला स्पर्श जाणवेल मलाही त्यांच्या अस्ताव्यस्त टाकलेल्या वस्तूतून..पण माझं पांगोळ्यागत झालेलं सैरभैर मन थाऱ्यावर येईल हे मात्र नक्की..जगण्याचा पुन्हा उत्सव होईल हे ही तितकेच खरे !
यावेळी कवी महेश देशमुख यांनी 'मव्हळ' या कवितेत मधमाश्यांची जीवन कहाणी सांगितली आहे, मव्हळ तयार करणाऱ्या माशा, राणीमाशी यांच्या कार्य पद्धतीचे वर्णन करताना मुलांनी मव्हळlला दगड मारल्यास काय होते याचे वर्णन कवितेत करताना म्हटले आहे
डसू लागल्यात माशा
मनी धरोनिया डुख
रस सोसणाऱ्या सोंडी
वकु लागल्यात ईख.
कवी भानुदास धोत्रे आपल्या 'जाऊ देना गावाकडे शहरा मला सोड ' या कवितेत शहरात राहणारा परंतु गावाची ओढ असणाऱ्या व्यक्तींची घालमेल आपल्या कवितेतून मांडतात...
नदीतून पाणी कसं झुळू झुळू वाहे
वासराला मोरी गाय टुकू मुकू पाहे
मयलेकराचे नाते मुकी मुकी ओढ
जाऊ दे ना गावाकडे शहरा मला सोड
गाव माझा गोड मला त्याची ओढ.
दीपक कुलकर्णी आपल्या 'लेक' बाप लेकीच्या नात्या सोबत लेक कशी असते याचे छान वर्णन करतात..
लेक लयी गोड, जशी मधात साखर, तिच्या एका येण्याने गोळा होती रं पाखरं
म्हणत तिचं वागणं बोलणं हसणं रडणं व्यक्त करत म्हणतात,
लेक परक्याचे धन
म्हणू नका असे कुणी
थकलेल्या माझ्या देहा
तीच पाजविते पाणी..
कवी राम जोशी आपल्या 'जीवन' या कवितेत जीवन हे फुल आहे , फुला वेलीनी फुलत राहावे, आयुष्यात डुलत राहावे म्हणत, म्हणतात..
आयुष्याच्या संध्याकाळी
रमून जाते मन
भूतकाळाच्या पांगोळ्यागत
पालवी कधी फुटत नसते
वठलेल्या झाडांना
म्हणून फुलणं सोडायचं नसतं...
कवी डॉ. एन. व्ही. सिंगापुरे हे 'सहजच आपलं म्हणतेस काय?' या कवितेतून आधुनिक युगातील प्रेम व्यक्त करतात.
या काव्य मैफलीत अनेक श्रोते उपस्थित होते. ही काव्य मैफिल यशस्वी करण्यासाठी सौ. दिपाली भावसार व सौ. शारदा गरुड यांनी प्रयत्न केले.

