ज्ञानोत्सव 2025' वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप
परभणी (संपादक, समाजहित न्यूज वृत्तांत) येथील जानोपासक महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप प्रसंगी समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कवी व साहित्यिक प्रो.डॉ. दासू वैद्य उपस्थित होते. स्नेहसंमेलनात 9 जानेवारी ते 13 जानेवारी याकाळात विविध क्रीडा व सांस्कृतिक, बौद्धिक स्पर्धाचे आयोजन केले होते. या स्पर्धाचा समारोप व बक्षीस वितरणाचा कार्यक्रमाचे आयोजन 13 जानेवारीला केले होते. यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानोपासक शिक्षण मंडळ, परभणीच्या सचिव, डॉ. संध्याताई दुधगावकर, प्रमुख उपस्थितीमध्ये ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे सहसचिव, श्री समीरभाऊ गणेशराव दुधगावकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेख मो. बाबर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विजय घोडके, आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक प्रा. डॉ. आनंद मनवर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रो. डॉ. भीमराव खाडे तसेच विद्यार्थी संसदेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शेख मो. बाबर यांनी करत असताना महाविद्यालयाच्या कारकिर्दीचा एकंदरीत आढावा घेतला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रवीण पुरी यांनी करून दिला. तसेच विद्यार्थी संसदेच्या अध्यक्षा कु. तनुजा सामाले यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव श्री समीरभाऊ गणेशराव दुधगावकर यांनी विद्यार्थ्यांनी क्रिएटिव्ह असावे म्हणजेच प्रगती संपन्न व्हावे, यासाठीच स्नेहसंमेलनाचे आयोजन केलेले असते म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात उत्साहाने भाग घेतला पाहिजे. त्यातूनच आपले व्यक्तिमत्व व्यक्त होते, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. दासू वैद्य यांनी हाच धागा धरून आपले मत व्यक्त करताना असे म्हटले, की या पुढचे जग माणसाला भौतिक संपत्तीने श्रीमंत करणारे नसून ज्याच्याकडे खूप कल्पना आहेत तोच व्यक्ती श्रीमंत असेल या आईन्स्टाईनच्या विचाराचा दाखला देऊन माणसाची कल्पकता ही अतिशय महत्त्वाची आहे आणि निसर्गाने माणसाला जो सारखा मंदू दिला आहे त्याचा विकास करण्यासाठी रंगमंच ही एक महत्त्वपूर्ण जागा आहे, असे मत मांडले, जीवनात ज्या कला विज्ञान माणसाला उपयुक्त आहेत व आपलं जीवन सुसह्य बनवते उन्नत करते, अशा नैसर्गिक सर्व क्षेत्रात दैवत्व असते म्हणून कलेच्या माध्यमातून माणसाने सतत स्वतःचा शोध घेतला पाहिजे, अशा पद्धतीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. सौ. संध्याताई दुधगावकर यांनी माणसाला जीवनात जे जे अनुभव येतात त्यातून स्वतःची माणूस म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे व सर्व महामानवांनी जे तत्त्वज्ञान सांगितले आहे त्यातून फक्त मानवता धर्म हाच विकसित केला पाहिजे. माणसाने माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे व विद्यार्थी जीवनाचा हा जो सुवर्णकाळ आहे त्याचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांनी स्वतःचे चारित्र्य घडवले पाहिजे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गणेश मारेवाड तर आभार प्रदर्शन कु. संचिता गौतम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. भास्कर गायकवाड, प्रा. राहुल अपशेट्टी, प्रा. आनंद लोखंडे, प्रा. वृषभनाथ नालटे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

