- न्यायाच्या प्रतीक्षेत कुकडे परिवाराची आर्त हाकस्थ
- स्थानिक आमदार डॉ.राहूल पाटलांना समाजाने घातले साकडे
परभणी (जेष्ठ पत्रकार दत्तात्रय कराळे/परभणी) सकाळी कामावर गेलेला सुरज घरी परतलाच नाही. रात्री उशीरा कामाच्या ठिकाणाहून म्हणजेच तो जेथे कामाला होता त्या पांडुरंग हॉस्पिटल मधून अचानक आलेल्या फोनमुळे धास्तावलेले आई-वडील व मामा तात्काळ कामाच्या ठिकाणी पोहोचले. तेथे पोहोचल्यावर त्यांना सुरज कुठे हे न सांगता १५-२० मिनीटे निव्वळ उडवा-उडवीची उत्तरे देणाऱ्या डॉक्टरांचा त्यांना दाट संशय आला. काळजाचे पाणी पाणी झालेल्या आई-वडिलांनी घाबरुन सुरजच्या मामाला बोलावले. घाबरलेल्या अवस्थेतील शब्द ऐकून धावत पळत आलेल्या मामांनाही तेथे तोच अनुभव आला. गर्भगळीत झालेला मामा, पण संयमाचा बांध तुटल्यामुळे त्यांनी जेव्हा रुद्रावतार धारण केला. तेव्हा उपस्थित तिन्ही डॉक्टरांनी हळूहळू पलायन केले. त्यामुळे संशय अधिकच बळावलेल्या कुटुंबियांचा पूरता धीर खचला होता. मामा पुन्हा रागावले तेव्हा कुठे एका व्यक्तीने कोनाड्यातील बंद रुममध्ये सुरज निश्चिंतावस्थेत पडल्याचे दाखवले. ते बघून सर्वांनीच हंबरडा फोडला. वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता घटनास्थळी असलेले तिन्ही डॉक्टर हळूहळू पसार झाल्यामुळे काहीच कळू शकले नाही. सुरजच्या त्या कथित मारेकऱ्यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. जो पर्यंत त्यांचा शोध लागला जात नाही, तो पर्यंत नाव पांडुरंग परंतु कथित कारनामे असलेल्या त्या हॉस्पिटलला टाळे ठोकून तेथील डॉक्टरांसह सर्व स्टाफची कसून चौकशी झालीच पाहिजे, अशी आर्त हाक देत सुरजच्या कुटुंबासह संपूर्ण तेली समाजाने ही मागणी लावून धरली आहे. एवढेच नाही तर त्या सर्वांनी स्थानिक आमदार डॉ.राहूल पाटील यांनाही साकडे घालून न्यायाची मागणी केली आहे.
परभणी शहरातील वसमत रोडवरील श्री शिवाजी कॉलेज परिसरात पांडुरंग हॉस्पिटल आहे. सुरज संतोष कुकडे हा तरुण त्याच हॉस्पिटलमध्ये 'कॅथलॅब टेक्निशियन' म्हणून कर्तव्यावर होता. सुरजच्या संशयास्पद मृत्यूमुळे पांडुरंग हॉस्पिटल पुन्हा एकदा वादादीत टीकेच्या गर्तेत सापडले आहे. वारंवार संशयाच्या घटना या ठिकाणी घड(व)ल्या जात असल्याने अनेकांकडून या हॉस्पिटल बाबत शंकास्पद वक्तव्य ऐकायला मिळत असल्याचे बोलले जात आहे.
याप्रकरणी पांडुरंग हॉस्पिटल आणि संबंधित डॉक्टरांविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे समजते. पुढील तपास युध्दपातळीवर करुन सदर हॉस्पिटलची, डॉक्टरांची आणि कार्यरत सर्व स्टाफची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. आमदार डॉ.राहूल पाटील यांनी सुरजच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याबरोबरच घटनेतील वास्तव समोर आणण्याचे व दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल असे उपस्थित सर्व समाजाला दिले.
दरम्यान, जी काय चौकशी व्हायची ती होईल, गुन्हा सुध्दा दाखल केला जाईल परंतु दुर्दैवी कुकडे परिवारातील सुरज मात्र पुन्हा कधीही परत येणार नाही. उमदा, कष्टाळू, तरुण, तडफदार सुरजचा मात्र अस्त झाला आहे. आणखी किती जणांवर सुरजसारखी परिस्थिती ओढावली जाणार आहे. भविष्यात असा प्रसंग कोणावरही येता कामा नये, यासाठी पांडुरंग हॉस्पिटल हे खरोखरच शासन नियमांच्या अधिन आहे का ? कायद्याच्या कक्षेत व मेडिकल्सच्या नियमांत ते योग्य रितीने कार्यरत आहे का ? असे नानाविध प्रश्न पुढे येत असून महापालिका व वैद्यकीय सेवेच्या नियमानुसार हे हॉस्पिटल नसल्याचेही बोलले जात आहे. याचीही कसून तपासणी झाली पाहिजे, असे अनेकांना वाटणे स्वाभाविक आहे. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावता कामा नये, याचाही पोलीस, महापालिका, जिल्हापरिषद, मेडीकल आणि आरोग्य विभागाच्या प्रशासनाकडून चौकशीचा दोर नियमाप्रमाणे परंतु कसून आवळला जाईल, अशी खात्री बाळगायला हरकत नाही, तूर्त एवढेच पूरे, अन्यथा संतप्त तेली समाजाच्या रोषाचा सामना करावा लागेल एवढे नक्की..!
संस्थापक संपादक प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821✍️


