त्याच तारखेनुसार मी दरवर्षी वाढदिवस साजरा करीत असतो. मित्र मंडळींचा आग्रह तसा प्रत्येक वर्षी असतोच म्हणा. शिवाय परिवारातील सर्वांनाच माझ्या वाढदिवसाचं तसं म्हटलं तर आकर्षणच असतं. कारण त्या निमित्ताने केक मागविला जातो. मग विशेष जेवणाचा कार्यक्रम घरी असो वा एखाद्या खास नि आवडत्या हॉटेलमध्ये. तेथे मिळणारा जेवणाचा आस्वाद काही औरच असतो. तोही एकत्र मिळून मिसळून, हास्याचे कारंजे, भेंड्यांची मज्जा, विचारांची देवाण-घेवाण, आदान-प्रदान करीत करीत आनंदाची लयलूट केली जाते. तीही निराळीच असते. त्यात फोटो सेशन वेगळंच. त्या निमित्ताने निरनिराळ्या पोजमध्ये काढलेले फोटो किमान सहा महिने तरी या ना त्या निमित्ताने बघितले जातात. तेवढाच विरंगुळा. असो,
मागील दोन वर्षांपासून मी व माझा परिवार मुंबई सोडून परभणीत वास्तव्यास आलो आहोत. जो आनंद मुंबईत मिळत होता, तसा येथे मात्र मिळत नाही. परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र, हितचिंतक आणि असंख्य स्नेही मिळून हा वाढदिवस दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करीत होतो. त्या औचित्यावर किमान १२० पानांचा कराळे समाचारचा विशेष अंक प्रतिवर्षी प्रकाशित केला जात असे. हितचिंतक- जाहिरातदार खुशीने जाहिराती देत असत. त्या निमित्ताने त्यांच्यासाठी एका रिसॉर्टमध्ये मोठ्या प्रमाणात पार्टी आयोजित केली जायची. सकाळी राजकीय मित्र व काही हितचिंतक, मित्र
कार्यालयात केक कापून माझा वाढदिवस साजरा करीत असत. पेढे, वेफर, समोसा व चहा अशा प्रकारचा नास्ता व फोटोसेशन झाल्यानंतर दुपारी रिसॉर्ट गाठले जायचे. मोठमोठ्या स्विमिंग पूलमध्ये रेन डान्स, घसरगुंडी व जेवणासह कोल्ड्रिंक्सचा आस्वाद घेता घेता संध्याकाळ कधी व्हायची, हे कळतच नसायचे. वाढदिवसाच्या औचित्यावर माझे सर्व मित्र, हितचिंतक मला सर्वोतोपरी सहकार्य करीत असत. त्यात रिसॉर्ट मालक असलेले राजकीय मित्र सुद्धा मैत्रीचे संबंध जोपासत असतं. त्या सर्व आनंदाला, मैत्रीला व नातेसंबंधांना नाईलाज म्हणून मुरड घालत आम्ही थेट 'जगात जर्मनी व भारतात परभणी' म्हणून संबोधले जाणाऱ्या या आपल्या शहरात येऊन वास्तव्य करीत आहोत. आमच्या सर्वांच्या आनंदावर हे जगणं म्हणजे एकप्रकारे विसर्जन घातल्यासारखेच आहे, असं म्हटलं तर मुळीच चुकीचं ठरणार नाही. याचं एकमेव कारण म्हणजे माझं वाढलेलं वय आणि कमी होत चाललेला आयुष्यातील उर्वरित काळ. हे सर्व परिवारातील सर्वांच्या आनंदाला मुरड घातल्यासारखेच वाटतेय. जणू काही वैयक्तिक आणीबाणीच लावल्यासारखे सर्वजण निमुटपणे सहन करीत आहेत. कदाचित माझ्या पश्चात ते पुन्हा मुंबईला जाऊ शकतीलही. पुन्हा तोच व्यवसाय सुरु करुन त्या व्यवसायाबरोबरच गतकालीन आनंदाची ही मज्जा पुन्हा ते घेऊ शकतील, हे मुळीच नाकारता येणार नाही.
असो, यावर्षी माझे वय ७१ वर्षे असून पुढील चार वर्षांनंतर मी माझ्या आयुष्याची पंच्याहत्तरी पूर्ण करु शकेल. परमेश्वरांनी साथ दिली तर आणि तुमच्या सर्वांचे प्रेम राहिले गेले तर आणि तरच मी माझ्या आयुष्याचे अमृतमहोत्सवी वर्षे साजरे करु शकेल. मोठ्या धुमधडाक्यात तो क्षण साजरा केला जावा, अशी माझी अतीव इच्छा असणार आहे. त्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात ज्यांनी ज्यांनी माझ्यावर आजपर्यंत प्रेम केले आहे. स्नेहाचे नाते जोपासले आहे. मैत्री धर्म पाळत ते नाते सांभाळले आहे. ज्यांनी माझ्या पडत्या काळात भरीव अशी मदत केली आहे. उद्योग, व्यवसाय वाढीसाठी ज्यांनी हातभार लावला आहे. मग जाहिरातींचे सातत्य राखले जाणेअसो, वा मैत्री बरोबरच भरीव अशी आर्थिक मदतीचे औदार्य असो, अशा सर्व मित्रांना त्या कार्यक्रमात आवर्जून निमंत्रित केले जाईल, यात तिळमात्र शंका नसावी. माझ्या व त्यांच्याही आनंदाला पारावार राहिला जाणार नाही, हे नक्कीच सांगता येईल, असा मला विश्वास आहे. त्याच औचित्यावर मी जो संकल्प सोडणार आहे, तोही सर्वांच्या साक्षीने जाहीर करणार आहे. या शुभ दिनी मी माझ्या सर्व अवयवांचे दान दिल्याची रितसर औपचारिकता पूर्णत्वास नेऊन जे जे कायदेविषयक करणे आवश्यक आहे, ते सर्व उपस्थित डॉक्टरांच्या अनुमतीने प्रदान करणारे आहे. ही माझी अंतिम इच्छा परिवारातील सर्व घटकांच्या अनुमतीनेच करणार आहे. यात कोणतीही शंका नसावी. ज्यामुळे दान केले जाणारे माझे सर्व अवयव कोणा तरी गरजूंना उपयोगी पडले जातील. माझ्यामुळे कोणाला तरी दृष्टी मिळू शकेल. कोणाला किडनी मिळू शकेल. कोणाला हृदय मिळू शकेल. त्याशिवाय अन्य जे जे काही देणे योग्य ठरु शकेल, ते ते डॉक्टरांच्या सल्ल्याने दान केले जाईल यात तिळमात्र शंका नाही.
लेख - दत्तात्रय कराळे

