हैद्राबाद - तेलंगणा (समाजहित न्यूज वृत्तांत) समाजकारण, संघटनात्मक नेतृत्व आणि विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे परभणी जिल्ह्याचे सुपुत्र देविदास कोंडीबा महामुने उर्फ देवा भाऊ यांना प्रतिष्ठेचा मानला जाणारा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता राष्ट्रीय पुरस्कार 2026” प्रदान करण्यात आला आहे. समता साहित्य अकादमीच्या वतीने हैदराबाद (तेलंगणा) येथे आयोजित “राष्ट्रीय गौरव पुरस्कार सोहळा - 2026” मध्ये दिनांक 10 मे 2026 रोजी त्यांचा गौरव करण्यात आला. समता साहित्य अकादमीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या राष्ट्रीय पुरस्कारासाठी देविदास महामुने यांची निवड त्यांच्या बहुआयामी सामाजिक कार्याचा सखोल आढावा घेऊन करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले देविदास कोंडीबा महामुने हे जायकवाडी पाटबंधारे विभागात कालवा चौकीदार म्हणून कार्यरत असून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार संघाचे महाराष्ट्र पदाधिकारी तसेच ढोर समाजाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणूनही ते कार्यरत आहेत. गोरगरीब आणि वंचित नागरिकांना मदतीचा हात देणारे समाजसेवक म्हणून त्यांची विशेष ख्याती आहे. हैदराबाद येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात कर्नल व्ही. के. पोकरियाल, पद्मश्री अशोककुमार हलदर, प्रो. डॉ. माया देवी, समता साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. डी. एस. तांडेकर आणि महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ. विजय कुलदीपके यांच्या हस्ते देविदास कोंडीबा महामुने उर्फ देवा भाऊ यांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता राष्ट्रीय पुरस्कार 2026” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासाठी निवड जाहीर करताना समता साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बी. एस. तांडेकर आणि महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ. विजय कुलदीपके यांनी त्यांना अधिकृत निवडपत्र प्रदान केले होते. समाजातील वंचित आणि गरजू घटकांसाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणारे तसेच प्रभावी संघटनात्मक नेतृत्व उभे करणारे देवा महामुने यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल परभणी जिल्ह्यासह विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

