परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) येथील शारदा महाविद्यालयात सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व शारदा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्त व महाराष्ट्राचे शिल्पकार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्ताने विद्वाता परिषद व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बबन पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. कालिदास गुडदे उपस्थित होते. तर यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष नाकाडे व कार्यक्रमाचे संयोजक अतुल साळवे उपस्थित होते. यावेळी बोलतांना डॉ. कालिदास गुडदे म्हणाले की, महापुरुषांची जयंती साजरी का केली जाते, तर त्यामधून त्यांचे जीवन चरित्र अभ्यासता येते व आपल्या व्यक्तित्वाचा विकास करता येतो. त्या अनुषंगाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व यशवंतराव चव्हाण यांचे कार्य व कर्तृत्व आपल्याला सतत प्रेरणा देते व त्यातूनच माणसाला जगण्याची प्रेरणा मिळते असे मत प्रतिपादन केले.
त्यानंतर अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. बबन पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांचे देशाचे उप पंतप्रधान, संरक्षण मंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्य कर्तृत्वाचाही सविस्तर आढावा घेतला. यानंतर शाहीर हरिभाऊ कदम व सहकाऱ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील पोवाडा सादर केला. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शाम पाठक यांनी, प्रास्ताविक प्रा. डॉ. संतोष नाकाडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. सचिन खडके यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नय्युम शेख, डॉ. एन. व्ही. सिंगापुरे यांनी प्रयत्न केले.


