परभणी, (समाजहित न्यूज वृत्तांत) : अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दिनांक 15 मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यासाठी बँक तपशिल भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने सर्व विद्यार्थ्याचे बँक तपशिल भरुन घेण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी केले आहे.
शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या / शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विदयार्थ्यांपैकी 11 वी, 12 वी तसेच 12 नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात/शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील मुलां/मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणीक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सदर योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर दिनांक 15 जानेवारी, 2025 पर्यंत स्विकारण्यात आलेले होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची व्याप्ती तालूका स्तरापर्यंत वाढविण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांचे उशिरा सुरु होणारे शैक्षणिक सत्र, ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी इत्यादी कारणामुळे विविध विद्यार्थी संघटना, पालक, विद्यार्थी यांचेकडून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील स्वाधार योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती केलेली आहे. या सर्व बाबी विचारात घेता अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दिनांक 15 मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यासाठी बँक तपशिल भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने सर्व विद्यार्थ्याचे बँक तपशिल भरुन घेण्याच्या अनुषगाने तात्काळ कार्यवाही करावी, असे श्रीमती गुठ्ठे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

