![]() |
परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) शारदा महाविद्यालयात मानसशास्त्र विभागाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बबन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी सुरज कदम उपस्थित होते तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.शामसुंदर वाघमारे व सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत अंबुरे यांची उपस्थिती होती. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार सूरज कदम म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारावरच आजची पत्रकारिता कार्यरत असून समाजातील विविध समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य करत आहे. समाज माध्यमांचा बोलबाला दिसत असला तरी छापील माध्यमे आजही आणि उद्याही आपले स्थान टिकवून ठेवेल कारण छापील माध्यमे, वृत्तपत्राना मरण नाही असे गौरवउदगार काढत त्यांनी वृत्तपत्रे हा समाजाचा आरसा असल्याचे मत प्रतिपादन केले. यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.बबन पवार म्हणाले की, ब्रिटिश काळातील बाळशास्त्री जांभेकर यांचे कार्य महत्त्वपूर्ण होते, त्यांच्या दर्पण वृत्तपत्राने तत्कालीन समाज जागृतीचे मोठे कार्य केले आहे. यावेळी औराद शहाजनी जिल्हा लातूर येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयाने शिवजयंती निमित्त घेतलेल्या विद्यापीठ स्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल कु.अकांक्षा चोपडे हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. एन. व्ही. सिंगापुरे यांनी केले तर आभार डॉ. अविनाश पांचाळ यांनी मांडले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रशांत मेने, सुरेश जयपुरकर, डॉ. डी. बी. मुंढे, डॉ. गोपाल पेदापल्ली, , प्रा.माणिक लिंगायत, प्रा. सानिया सदफ,, मुत्रटकर राजाराम, संतोष येडके, काझी नसीरोद्दीन यांनी प्रयत्न केले.

