परभणी, दि. 27 (समाजहित न्यूज वृत्तांत) : जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2, परभणी यांच्या अधिनस्त परभणी शहराभोवती असणाऱ्या जायकवाडी पैठण डावा कालव्याच्या परिसरात अनधिकृतपणे करण्यात आलेल्या अतिक्रमण हटवण्याची अंतिम कार्यवाही 5 मार्च 2025 रोजी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. अतिक्रमणधारकांनी 5 मार्च पूर्वी आपले साहित्य स्वतःहून हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अनधिकृत अतिक्रमणाबाबत प्रशासनाने 7 जानेवारी, 15 जानेवारी आणि 22 जानेवारी 2025 रोजी नोटिसा बजावल्या होत्या. तसेच 6 फेब्रुवारी 2025 रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत अतिक्रमणधारकांना 11 फेब्रुवारीपर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि, 11 फेब्रुवारी रोजी अतिक्रमणधारकांनी विभागीय कार्यालयासमोर मोर्चा काढून कार्यवाहीसाठी एक महिन्याची मुदतवाढ मागितली होती. प्रशासनाने त्यांना 10 दिवसांची संधी दिली आणि 27 फेब्रुवारीपर्यंत वरिष्ठ स्तरावरून स्थगिती मिळविण्याचे निर्देश दिले. मात्र, दिनांक 27 फेब्रुवारी 2025 पर्यंत कोणतीही स्थगिती न मिळाल्याने प्रशासनाने 5 मार्च 2025 रोजी अतिक्रमण हटवण्याची अंतिम कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रशासनाने अतिक्रमणधारकांना 5 मार्च 2025 पूर्वी आपले साहित्य स्वतःहून हलविण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरुन आपले आर्थिक नुकसान होणार नाही, असे उपकार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे क्र.2, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
