परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरुन जन्मदात्या बापानेच आपल्या पोटच्या मुलाचा रात्री निद्रावस्थेत असतांना अत्यंत निर्दयपणे खून केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान, पूर्णा तालुक्यातील पिंपरी (देशमुख) हे गाव ताडकळस पोलिस ठाण्याच्या कार्यकक्षेत येते. या घटनेतील लिप्त दोन्ही आरोपींच्या मोठ्या शिताफीने पकडण्यात आले आहे.
पिंपरी देशमुख येथील माधव अवकाळे यांचा मुलगा गोविंद अवकाळे याने स्व जातीतील एका तरुणीशी नुकताच तीर्थक्षेत्र आळंदी येथे जावून प्रेमविवाह केला होता. दोन अडीच महिन्यांपासून ते जोडपे भीतीपोटी पुण्यातच राहत होते. परंतु, त्या गोष्टीचा माधव आवकाळे यांना तीव्र संताप आला होता. त्याच रागापोटी अवकाळे यांनी स्वतःच्या मुलास बोलावून घेतले होते. ९ जूनच्या रात्री गोविंद हा घरी न झोपता तो शेतात गेला होता. गाढ निद्रावस्थेतील गोविंद याच्यावर पिता माधव आवकाळे व त्यांचा दुसरा मुलगा व्यंकटेश आवकाळे या दोघांनी संगनमत करुन धारदार शस्त्राने मृतक गोविंद याच्या डोक्यावर, डोळ्यावर आणि मनगटावर अत्यंत निर्दयपणे सपासप वार केले. त्यात गोविंद जागीच ठार झाला.
या घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलिसांनी मौजे पिंपरी (दे.) येथे धाव घेतली. त्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक कपील शेळके, उपनिरिक्षक गजानन काठेवाड, शिवकांत नागरगोजे, आप्पाराव वराडे, अतुल टेहरे, संदीप साळवे आदींनी घटनास्थळी जावून परिस्थितीची पहाणी करुन लगेचच तपास सुरु केला. त्यात आरोपी हे कौटुंबिक सदस्य असल्याचे निदर्शनास आल्याबरोबर माधव आवकाळे व व्यंकटेश आवकाळे या दोघांनाही झडप घालून शिताफीने पकडले. या प्रकरणी आप्पाराव वराडे यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व दु:ख व्यक्त केले जात आहे. एकूणच काय तर 'बापच बनला मुलाचा खूनी' असेच यातून सिद्ध होत आहे. तद्वतच स्वतःबरोबर दुसऱ्या मुलालाही खूनी बनविणाऱ्या बापाबद्दल सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
संस्थापक संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

