माणुसकीच्या धर्माशी आणि त्यातील कर्तव्य संकेतांशी प्रतारणा करून विचारांचा व्यभिचार करीत अनैतिकतेचा उच्छाद मांडणारी माणसं हे सामाजिक शांतता आणि निरोगी समाजव्यवस्थेला लागलेले मोठे ग्रहण ठरते.अशी माणसं, मग ती कोणत्याही क्षेत्रातली असोत की प्रशानात काम करणारी, ती सारी एकाच माळेतील मणि असतात.त्यांचा मेरूमणीच जर बिघडलेला असेल तर या व्यभिचाराच्या अतिरेकाने निर्माण झालेला हा दुर्धर कर्करोग शांतशील समाजासाठी अत्यंत वेदनादायी म्हणून सिध्द होत असतो. मग ज्यांच्यावर सेवाक्षेत्रांच्या जबाबदाऱ्या सोपविलेल्या असतात,ती अशी बदललेली माणसं समाजसाधक नव्हे सतत वेदना देणारे समाजदुभाजक ठरतात.
" सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे ब्रिदवक्य घेऊन दुर्जनांचे कठोर ताडण आणि सज्जनांचे संरक्षण करून शांततामय निरोगी समाजव्यवस्थेसाठी पोलिस खात्याची निर्मिती झाली.पूर्वी या पोलिसांतील साधा शिपाई दादा कींवा अधिकारी जरी समोर दिसला तर गुन्हेगारांना पडता भुई कमी पडत होती.कठोर जरब होती आणि समाज सुरक्षिततेच्या खात्रीने समाजही निश्चिंत होता.परंतू आज परिस्थिती एवढी बिघडलेली आहे की आडमार्गाने श्रीमंत होण्याच्या स्वार्थाने पोलिस खात्याला काही नतद्रष्टांच्या पापी कर्माने भ्रष्टाचार,अनाचार,आणि व्यभिचारांची वाळवी लागलेली आहे.त्यामुळे पूर्वी चोर,लुटेरे,क्रूर अपराधी ही समाजाची संकटे होती.परंतू आज मानवी जीवनमुल्ल्ये आणि संविधानिक कर्तव्यांचे रस्ते चुकलेल्या पोलिस खात्यातील काही अधिकाऱ्यांचा लज्जास्पद आणि तेवढेच क्रूर रावणी अवतार पाहून ही अंगात भुतं शिरलेली माणसं आहेत की कोण या विचाराने समाजातील संवेदनशील मने चिंताक्रांत आणि हताश झालेली आहेत.
पोलिस खात्याचा एक रूबाबी काळ होता. पोलिस दादा दंडा आपटत जरी आला तरी घाबरून चोर पळायचे.परंतू बिघडलेल्या मनोवृत्तीतून समोर येणाऱ्या अनंत मृगजळांनी त्या पोलिस दलाची आज काय अवस्था झालेली आहे.ही एक चिंतनिय बाब आहे.स्वत:चा प्रभावशाली पुरूषार्थही गहाण टाकण्याईतकी ही वाईट अवस्था करून घेण्याची दुर्बुद्धी या दलातील अपप्रवत्तींना कशी आली? अनैतिक प्रवृत्तींच्या काही पोलिसांमुळेच संविधानिक कर्तव्यांशी प्रतारणा आणि समाजाप्रतीच्या अन्याय वागणूकीने एक उलटा प्रवाह सुरू झाला आहे. समाकंटक जहरी दलालांनी पोलिस खात्याला पाहिजे तसं वाकवण्याचे प्रयत्न सुरू करून या संसर्गजन्य वाळवीने ग्रासून टाकलेले आहे.त्यामुळे स्वत: ला माणसं म्हणविणाऱ्या या माणसांमुळे "काय होतास तुम्ही काय झालास तुम्ही" अशा विचाराने पोलिस खात्याच्या प्रतिमेवरच आज एक कठीण प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुण्यात पब,क्लब आणि अनैतिक उद्योगातून माया जमवणाऱ्या पुण्यातील पोलिसांना आमदार धंगेकरांनी धारेवर धरलं.आजकाल अनेक पोलिस ठाण्यांमधून निरपराधांना संरक्षण तर मिळत नाहीच,तर माया कमावण्यासाठी चटावलेले अनेक मतीभ्रष्ट पोलिस समाजातील तक्रारकर्त्यांवरच दबाव आणून त्यांना चूप बसण्यास बाध्य करतात.संविधानिक कर्तव्याशी प्रतारणा करण्याची बेशरम वृत्ती स्विकारून स्वतःची उखळं पांढरी करून घेतात.अनैतिक उद्योग आणि व्यभिचाऱ्यांना जाब विचारणाऱ्या,किंवा त्याला वाचा फोडून चव्हाट्यावर आणणाऱ्या अनेक पत्रकार आणि समाजसेवकांवर आज हल्ले होत आहेत. चुकीच्या लोकांना तोंडी लाऊन नेहमी संरक्षित करण्याची मधुर धोरणे या वाढत्या उन्मत्तपणाला कारणीभूत आहेत.म्हणून पोलिस खात्यातील असे काही ठग हे हे परिस्थिती नियंत्रणात आणणारे नाहीत बिघडविणारे बिघाडखोर म्हणून पुढे येत आहेत. महिलांना शिविगाळ आणि मारहाण होत आहेत.संरक्षण मागण्यास पोलिसांकडे जाणाऱ्या या लोकांना तक्रारी आणणारं सावज समजून या आयत्या संधीचे फायदे घेणारे नागोबा पाहिजे ते गुन्हे न नोंदवता आरोपींना संरक्षित करण्याचे नसते उद्योग फक्त करीत राहतात.स्वतःचे फायदे करून घेणे हाच आपला उद्योग समजतात.
राष्ट्राचे आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची मुस्कटदाबी करू पाहणाऱ्या हरामी हल्लेखोरांना वठणीवर आणून जरब बसवण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्यांची निर्मिती करण्यात आली.परंतू त्यांची अंमलबजावणी अपवादानेच एखाद्या प्रामाणिक असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांकडून होते.मात्र गुन्हेगारांना अभय देऊन त्याला आणखी मस्ती करायला मोकळं सोडल्या जाते.हेच पोलिस दलाचं प्रामाणिक कर्तव्य आहे का? पोलिस दलाच्या प्रतिष्ठेला काळीमा फासणाऱ्या काही पाशवी वृत्तीच्या प्रेमवीरांनी महिला शोषणातही आजकाल आघाडी घेतलेली आहे.एवढेच नव्हे शोषण झाल्याच्या तक्रारींना केराची टोपली दाखवून त्या कारवाया थांबण्यासाठी समाजातील पांढरपेशा ढोंगी अपराध्यांकडून लाखोची माया उकळणारे पोलिस अधिकारी हे समाजासाठी आज लांच्छनास्पद ठरत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाचा अभाव आणि शासनाचाही दुर्लक्षितपणा ही सामाजिक कर्तव्याशी होणारी घोर प्रतारणा आहे!
प्रशासनातील उणिवा दाखविण्याचे प्रयत्न होतात तेव्हा सरकारी कामात व्यत्यय म्हणून कायद्यांची हत्त्यारं तातडीने वापरली जातात. परंतू नीतिभ्रष्ट अधिकारी आणि अवैधपणे मलिदे लाटणाऱ्या अनैतिक घटकांविरूध्द संघर्ष करणारे पत्रकार आणि समाजसेवकांवर मात्र हल्ले होत राहतात. अशावेळी मात्र कायद्यांची कलमे संथगतीने का चालविली जातात ? पत्रकारांसाठी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार आणि समाजसेवकांसाठी संबंधित कायद्यांची कडक कलमे पोलिस का वापरत नाहीत?
यांची उत्तरे मिळत नसतील... तर हा समाजावरील अक्षम्य अन्याय आणि लोकशाही व संविधानाशी होणारी ही प्रचंड प्रतारणा आहे...या भ्रष्ट मनोवृत्ती आणि विषमतेविरूध्द पत्रकार तथा समाजसेवकांनी आता संघटीत झालंच पाहिजे...! पोलिस खात्यातील जुलूमी भ्रष्टांना जाब विचारण्यासाठी,त्यांचा लेखा जोखा गृह खात्याकडे पोहचवण्यासाठी आक्रमक पावित्रे आता घेतले पाहिजेत.
*विदर्भात अकोला जिल्ह्यातील* खुनी गुन्हेगारी कृत्ये,निरपराधांना मारहाणी आणि अनेक पोलिसांनी अपराध्यांना अभय देऊन घेतलेल्या बघ्याच्या भुमिकेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींनी डोके वर काढलेले आहे.त्यामुळे कायदा,सुव्यवस्था कोसळून सामाजिक शांतता संकटात आली आहे.येथी ज्येष्ठ पत्रकार पंजाबराव वर यांना एका उन्मत्तखोर राजकीय कार्यकर्त्याने मारहाण केली.पोलिसांनी अद्यापही पोलिस संरक्षण कायद्याने कार्यवाही केली नाही.एका गृहिणीला शिवीगाळ आणि तिच्या पतीला मारहाण होऊनही तिला संरक्षण नाही.आरोपी मोकाट असल्याने ते फणे वर काढण्याचे प्रयत्न करतात.
ह्या दोन घटना अकोल्यातील खदान पोलिस स्टेशनच्या आहेत.त्याबाबतित योग्य कार्यवाहीचा कर्तव्य धर्म पाळण्याऐवजी समाज धर्म बुडवून फक्त धनावर विजय मिळवू पाहणारे या पोलिस स्टेशनचे ठाणेदार धनंजय सायरे हे नागपूरात एका मुलीच्या तक्रारीने विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकलेले आहेत.सेवाधर्म सोडून नसती कामं करायला सुटी काढून नागपूरात गेल्याने त्याचे त्यांना मिळालेले हे प्रायश्चित्त आहे.खदान पोलास स्टेशनमधून योग्य कार्यवाही न झालेल्या या दोन्ही प्रकरणाबाबत अकोला पोलिस अधिक्षकांना लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या केन्द्रीय आणि त्यापूर्वी जिल्हा कार्यकारिणीने निवेदन देऊन पोलिस अधिक्षकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा सुध्दा केलेली आहे.तरी अकोला पोलिस अधिक्षकांना या कार्यवाहीबाबत अजून कर्तव्याची संवेदनशील जाणीव आणि संविधानिक जबाबदारीची उपरती झालेली दिसत नाही.पोलिसखात्याची स्वार्थी तथा विपरीत अन्याय्य वाटचाल, सामाजिक कर्तव्याशी महाराष्ट्रभर ठीकठीकाणी होणारी प्रतारणा हे सामाजिक संकट आहे. असेच जर घडत गेले तर समाजाला संरक्षित करून सावरणार कोण ? सहनशिलतेपलिकडे गेलेल्या गोष्टींमधून विद्रोह घडल्याशिवाय राहत नसतो.
===========================
लेखक :
संजय एम.देशमुख,( निंबेकर ) ज्येष्ठ पत्रकार
मो.क्र. ९८८१३०४५४६

