मुंबई : (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी रंगाअण्णा वैध आदर्श जिल्हा पत्रकार संघ आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार दिले जातात . 2023 च्या राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी विविध जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. विभागीय सचिवांच्या मार्फत 1 नोव्हेंबर पूर्वी या प्रवेशिका मराठी पत्रकार परिषदेकडे पोहोचाव्यात अशी अपेक्षा आहे.राज्यात अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे हे पुरस्कार मिळविण्यासाठी पत्रकार संघांमध्ये स्पर्धा असते. महाराष्ट्रात अनेक तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ उल्लेखनीय काम करीत असतात.. मात्र त्यांच्या या कार्याची फारशी कोणी दखल घेत नाही. त्यामुळे त्यांचे काम जगापर्यंत पोहोचतच नाही.. ही उणीव दूर करण्यासाठी दहा वर्षांपासून मराठी पत्रकार परिषदेनं पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारया पत्रकार संघांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची योजना सुरू केलेली आहे.. स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप असते..एका शानदार आणि भव्य कार्यक्रमात प्रामुख्यानं ग्रामीण भागात पुरस्कारांचे वितरण केले जाते. 2022 च्या पुरस्कारांचे वितरण नगर जिल्ह्यातील कर्जत येथे खा. संजय राऊत आणि आ. रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते . यावर्षीच्या पुरस्कारांचे वितरण जानेवारीमध्ये करण्यात येणार आहे.संघटनात्मक एकोप, आर्थिक पारदर्शकता, वेळेत निवडणुका, सामाजिक उपक्रम, मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नता, मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमातील सहभाग आदि गोष्टींचा पुरस्कारासाठी निवड करताना विचार केला जातो. प्रत्येक महसूल विभागातून एक अशा पध्दतीने आदर्श तालुका संघांची निवड केली जाते.. तर एका जिल्हा संघाला दरवर्षी सन्मानित केले जाते.1 नोव्हेंबर पर्यत प्रवेशिका प्राप्त झाल्यानंतर निवड समिती पुरस्कार्थी संघाची निवड करील त्याची घोषणा 3 डिसेंबर रोजी म्हणजे मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी केली जाईल. ज्या तालुका संघांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी आपल्या विभागातील विभागीय सचिवांशी संपर्क साधावा असे आवाहन एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे,कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी केले आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


