मुंबई ( समाजहित न्यूज वृत्तांत ) : संगीताच्या क्षेत्रात मोठं नाव कमावलेल्या सुप्रसिद्ध गायिका तथा पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर आणि ज्येष्ठ साहित्यिक अशोक लोटणकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते ज्येष्ठ पत्रकार तथा 'कराळे समाचार' व 'जनमत मराठवाडा' या मराठी वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रय वामनराव कराळे यांना "नारायण पेंडणेकर स्मृती पुरस्काराने सन्मानित" करण्यात आले आहे.
'एकता कल्चरल अकादमी' या नोंदणीकृत' संस्थेतर्फे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मागील २५ वर्षांपासून कला, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्राला वाहून घेतलेल्या या संस्थेतर्फे राज्य स्तरावर कार्यरत विविध क्षेत्रातील कांही निवडक नामवंतांना प्रत्येक वर्षी 'एकता पुरस्कार' देऊन गौरविण्यात येत असते.
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बाबत अकादमीच्या निवड समितीने २०२३-२०२४ सालासाठी *"नारायण पेंडणेकर स्मृती"* पुरस्कारासाठी पत्रकार दत्तात्रय कराळे यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याचे लेखी पत्र संस्थेतर्फे श्री.कराळे पाठविण्यात आले होते.
सदर पुरस्काराचे वितरण शनिवार, दिनांक १३ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ठिक ४ वाजता गिरगाव मधील 'मुंबई मराठी साहित्य संघ मंदिर नामक सुप्रसिध्द अशा डॉ.अ.ना. नाट्यगृहात' हा पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
परभणी महानगर मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय कराळे यांना यापूर्वी 'श्री छत्रपती शिवाजी महाराज समता राज्यस्तरीय पुरस्काराने' मुंबई येथे भव्य अशा एका आलिशान सभागृहात गौरविण्यात आले आहे. त्याशिवाय विविध संस्था, संघटना, मंडळं आणि अनेक राजकीय पक्षांकडून श्री. कराळे यांना आतापर्यंत २७ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
वसई-विरारसह मुंबई शहर व उपनगरातील विविध क्षेत्रांमधील अनेक नामवंत 'एकता कल्चरल अकादमी' या संस्थेवर कार्यरत आहेत. गोर-गरीब, गरजू, आदिवासी, वंचित, दीन दलीत, पद-दलितांच्या उन्नतीबरोबरच त्यांच्या भावी आयुष्याच्या जडण-घडणीसाठी या संस्थेने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात उल्लेखनीय असे कार्य केले आहे.
तद्वतच आयोजित भव्य अशा सोहळ्यात हा पुरस्कार पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर आणि सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक लोटणकर यांच्या हस्ते संस्थेचे स्मृती मानचिन्ह, प्रमाणपत्र, मेडल आणि शाल प्रदान करुन गौरव करण्यात आला आहे, दत्तात्रय कराळे यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी सुध्दा आजच्या तरुणाईला लाजवले जाईल असे अथक प्रयत्न आणि उल्लेखनीय पत्रकारिता केल्याबद्दल त्यांचा गौरव आणि अभिनंदन केले. त्याशिवाय पुढील वाटचालीसाठी भरभरुन शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
या पुरस्कारामुळे दत्तात्रय कराळे यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

